मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

शिमगा उत्सवामुळे अनेकांनी गावचा रस्ता धरला. त्यामुळे महामार्गावर एकच वाहनांची संख्या वाढली. परिणामी वाहतूक कोंडी वाढली.

    होळीनिमित्त चाकरमानी कोकणात आपापल्या गावी जायला निघाले असल्याने मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर ते माणगाव दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव ते लोणेरेदरम्यान शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. होळीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. कोकणच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. या कोंडीमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागला आहे.

    शिमगा उत्सवामुळे अनेकांनी गावचा रस्ता धरला. त्यामुळे महामार्गावर एकच वाहनांची संख्या वाढली. परिणामी वाहतूक कोंडी वाढली. माणगाव बाजारपेठ ते लोणेरे हायवे नाका इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महाड ते कोलाड या तासाभराच्या प्रवासाला अडीच तास लागत आहेत. प्रत्येकाला मुंबईत लवकर पोहोचण्याची घाई झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने चालवली जात आहेत. परिणामी, ही वाहतूक कोंडी झाली असून, वाहतूक पोलीस ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही कोंडी सोडवायला पोलीस बळ कमी पडत असल्याचे दिसून येते, त्यामुळे उपलब्ध कर्मचार्‍यांची दमछाक होत आहे.