पुण्यात पोलिसांना हेल्मेट सक्ती, पोलीस आयुक्तांचे आदेश; हेल्मेट न वापरल्यास थेट…

नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हेल्मेटसक्तीच्या दृष्टीने पाऊल उचलण्यास सुरूवात केली असून, शहर पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट अनिवार्य केले आहे.

  पुणे : नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हेल्मेटसक्तीच्या दृष्टीने पाऊल उचलण्यास सुरूवात केली असून, शहर पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट अनिवार्य केले आहे. त्याबाबतचे आदेश काढले आहेत. हेल्मेटविना प्रवास करणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली आहे. यामुळे शहरात पुन्हा हेल्मेटचा मुद्दा गाजणार असल्याचे दिसत आहे.

  पोलीस आयुक्त अमितेश कुमार हेल्मेटबाबत आग्रही आहेत. त्यांनी यापूर्वी काम केलेल्या शहरांमध्ये हेल्मेटसक्ती केली होती. तसेच पुण्यात देखील त्यांनी हेल्मेट वापराचा आग्रह धरणार असल्याचे म्हटले होते. ‘आधी जागृती, नंतर कारवाई’ हे धोरण अवलंबले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

  पोलीस आयुक्तांनी त्यादृष्टीने पाऊल उचलण्यास सुरूवात केली असून पोलीस दलापासून हेल्मेटसक्तीची सुरुवात केली आहे. बुधवारी त्या संदर्भातील सूचना सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पोलिसांनी दुचाकी वापरताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असेल. टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी सूचना देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःपासून करावी आणि लोकांसमोर उदाहरण ठेवावे, असेही आवाहन केले आहे.

  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता हेल्मेटसक्ती केली असली, तरी यापूर्वी डॉ. के. वेंकटेशम यांनी हेल्मेटसक्तीसाठी पाऊल उचलले होते. विनाहेल्मेट पोलीस कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाच्या आवारात प्रवेश देण्यात येत नव्हता. तो नियम आजही लागू आहे.

  चार लाख दुचाकीस्वारांवर हेल्मेट कारवाई

  वाहतूक पोलीस रस्त्यावर हेल्मेटची कारवाई करीत नसले, तरीही ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून प्राधान्याने सर्वाधिक कारवाई हेल्मेटचीच केली जाते. शहरात गेल्या वर्षभरात सुमारे चार लाखांहून अधिक दुचाकीस्वारांवर हेल्मेट परिधान न केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना तब्बल वर्षभरात ३६ कोटी रुपयांचा दंड बजावला आहे. त्यातील बहुतांशी रक्कम वसूल होणे बाकी आहे.

  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा, अशा सूचना दिल्या आहेत. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पोलिसांनी स्वत: आदर्श घालून द्यायला हवा.

  - अरविंद चावरिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त.