महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम; ‘हेमंत गोडसे म्हणाले उमेदवारी मलाच…’

खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करून देखील हेमंत गोडसेंचे नाव शिवसेनेच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत आलेले नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

  नाशिक : लोकसभा निवडणूक जवळ आली तरी महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करून देखील हेमंत गोडसेंचे नाव शिवसेनेच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत आलेले नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तसेच नाशिकमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत.

  या पार्श्वभूमीवर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे दोन दिवसांपासून मुंबईत शिवसैनिकांसह तळ ठोकून आहेत. आज ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास हेमंत गोडसेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. हेमंत गोडसे म्हणाले की, आपण काम करत चला. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. लवकरच नाशिक लोकसभेची अधिकृत घोषणा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिले आहे.  महायुतीतील सर्व पक्षांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतले जातात. म्हणूनच सर्वांसोबत चर्चा करून अधिकृत घोषणा लवकरच होणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

  दुसऱ्या यादीत माझे नाव येणार

  पहिल्या यादीत तुमचे नाव नाही, यावर विचारले असता हेमंत गोडसे म्हणाले की, शिवसेनेला 18 जागा मिळाव्यात, अशी आम्ही मागणी केली होती. हा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर होणार आहे.   त्यामुळे दुसऱ्या यादी माझे नाव नक्की जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. छगन भुजबळ आणि मनसेकडून नाशिकचा जागेवर दावा करण्यात आला आहे. याबाबत हेमंत गोडसेंना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला वाटते की, प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार असावा. परंतु याबाबतचा निर्णय राज्यस्तरीय नेते घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

  आमच्यावर अन्याय होणार नाही

  तुमची उमदेवारी अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला धाकधूक वाटते का? अशी विचारणा केली असता हेमंत गोडसे म्हणाले की, मला 100 टक्के विश्वास आहे की, आमच्यावर अन्याय होणार नाही, आमचे मुख्यमंत्री आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. महायुतीचा धर्म पाळला जाईल का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, 100 टक्के महायुतीचा धर्म पाळला जाईल. आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे. अधिकृत घोषणा लवकरच होईल, असे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.