कोरेगाव पार्कमधील महिलेचे गुप्तहेरांनी काढले लपून फोटो, गुप्तहेरांना आले अंगलट; पोलिसांनी सापळा रचून केली अटक

कोरेगांव पार्कमधील (Koregaon Park) एका महिलेचे गुप्तहेरांना लपून फोटो (Photo) काढणे चांगलेच अंगलट आले असून, पोलिसांनी (Police) गुप्तहेरांना सापळा रचून पकडले आहे.

    पुणे : कोरेगांव पार्कमधील (Koregaon Park) एका महिलेचे गुप्तहेरांना लपून फोटो (Photo) काढणे चांगलेच अंगलट आले असून, पोलिसांनी (Police) गुप्तहेरांना सापळा रचून पकडले आहे. ही महिला जाते कोठे, करते काय याची माहिती काढण्याचे काम या दोन गुप्तहेरांना मिळाले होते. त्यांची गुप्तहेर एजन्सी असून त्यांना एकाने हे काम दिले होते.

    निलेश लक्ष्मणसिंग परदेशी (वय २५, रा. वडगाव मावळ) व राहुल गुणवंतराव बिरादार (वय ३०, रा. देहुगाव, ता. मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार १ डिसेबर २०२२ पासून सुरु होता. याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोरेगांव पार्क परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, निलेश परदेशी याची गुप्तहेर संस्था असून बिरादार हे त्यांचे सहायक आहेत. ते माहिती काढून देण्याचे किंवा लक्ष ठेवण्याचे काम करतात. त्यांना एका व्यक्तीने तक्रारदार यांची माहिती काढण्याचे व त्या कोठे जातात काय करतात याची माहिती गोळा करण्याचे काम दिले होते. त्यानूसार, ते महिलेची माहिती काढत होते. त्या जेथे जात, तेथे त्यांचा कोणीतरी पाठलाग करुन त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून ते कोणाला तरी पाठवत असल्याचे महिलेच्या लक्षात आले.

    आपले फोटो काढून त्याचा गैरवापर करतील, सोशल मीडिया अथवा इतर घातपाती कृतीसाठी करण्याची शक्यता असल्याचा संशय आला.

    त्यांनी काही दिवसांपूर्वी भरोसा सेलकडे तक्रार केली. परंतु, त्यावर काही कारवाई झाली नाही. त्यांनी सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांची भेट घेतली. पोलिसांनी या महिलेवर कोण पाळत ठेवत आहे, याचा शोध घेणे सुरु केले. महिला या कोरेगाव पार्कमधील ऑर्थर्स थिम हॉटेलमध्ये ७ जानेवारी रोजी गेल्या होत्या. त्यावेळी दोघे जण लपून लांबून त्यांचे फोटो काढत होते. साध्या वेशात सापळा रचलेल्या पोलिसांना संशय आला. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते एका गुप्तचर संस्थेचे असल्याचे आढळून आले. त्यांना हे काम कोणी दिले याची माहिती ते देत नसून सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर अधिक तपास करीत आहेत.