उत्तम प्रतीच्या द्राक्षांना उच्चांकी दर, परराज्यातील व्यापारी दाखल; तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगामाची सुरुवात

तासगाव तालुक्यात अनेक अस्मानी संकटांवर मात करीत जिल्ह्यात यावर्षीचा द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला ४ किलोच्या पेटीला ३०० ते ३५० रुपयांपर्यंत दर व्यापाऱ्यांकडून मिळताना दिसत आहे. परराज्यातील व्यापारी द्राक्षबागांमध्ये दाखल झाले आहेत.

  तासगाव : तासगाव तालुक्यात अनेक अस्मानी संकटांवर मात करीत जिल्ह्यात यावर्षीचा द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला ४ किलोच्या पेटीला ३०० ते ३५० रुपयांपर्यंत दर व्यापाऱ्यांकडून मिळताना दिसत आहे. परराज्यातील व्यापारी द्राक्षबागांमध्ये दाखल झाले आहेत.

  द्राक्ष हंगामाची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही सुरुवातीपासून द्राक्ष पिकाला पावसाचे ग्रहण लागणार अशी चिन्हे दिसत होती. सलग तीन महिने पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील १५ ते २० टक्के बागा वाया गेल्या आहेत. ऑगस्टमध्ये केलेल्या बहुतांश छाटण्या यंदाही नुकसानीत होत्या. या पार्श्वभूमीवर या वर्षीचा द्राक्ष हंगाम आणि उत्पादन याबाबत साशंकता असताना नेहमीप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सर्व संकटावर मात करत शेतकऱ्यांनी द्राक्षे बाजारात आणली आहेत. सध्या तासगाव तालुक्‍यातील सावळज, डोंगरसोनी, मिरज तालुक्‍यांतील सोनी, भोसे, करोली परिसरातील द्राक्षे सध्या बाजारात आली आहेत.

  सांगली जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष हंगाम सुरू होतो. ख्रिसमसमुळे दर ही चांगले मिळतात. तासगाव तालुक्‍यातील डोंगरसोनी,मणेराजुरीची द्राक्षे दरवर्षी पहिल्यांदा बाजारात येतात. मात्र, मणेराजुरीतील द्राक्ष पिकाला गतवर्षी पावसाचा फटका बसला होता. परिणामी छाटण्या उशिरा झाल्या. सध्या द्राक्ष हंगाम सुरू झाला आहेत. मात्र, द्राक्षांचे प्रमाण अतिशय कमी आहे. बाजारात आलेल्या द्राक्षाला तुलनेत गोडीही कमी आहे. ऑगस्ट छाटणीच्या बागा डाऊनी, भुरीच्या प्रादुर्भावात सापडल्याने त्याचा परिणाम दर्जावर झाला आहे. तरीसुद्धा जिद्दीच्या जोरावर शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारचे द्राक्ष तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची चिन्हे आहेत.

  सावळजमध्ये निर्यातक्षम द्राक्षे

  सप्टेंबरमध्ये फळ छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु जिद्दीच्या जोरावर सावळज भागातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीची निर्यातक्षम द्राक्षे पिकवली आहेत. मुंबई बाजारपेठेत पहिल्याच टप्प्यात शरद सीडलेसला ५१५ तर सोनाकाला ४२५ रुपये पेटी (4 किलो) असा दर मिळाला आहे. दरवर्षीपेक्षा आगाप द्राक्षांसाठी हा दर कमी आहे.

  दर्जेदार द्राक्षांसाठी बुकिंग

  दरम्यान द्राक्ष हंगाम सुरू झाल्याने मुंबई, कोलकता, बंगळूरु, दिल्ली येथील द्राक्ष व्यापाऱ्यांचे आगमन तासगाव तालुक्यात झाले आहे. द्राक्ष बागा ठरवण्यासाठी द्राक्षबागांवर मध्यस्थ येऊ लागले आहेत. द्राक्ष उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता असली तरीही आतापासूनच दर्जेदार द्राक्षांसाठी बुकिंग करताना ते दिसत आहेत.

  सुरुवातीलाच ३५९ रुपये दर

  तासगाव तालुक्यातील सावळज येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी नितीन तारळेकर यांनी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष छाटणी घेतली होती. पिक छाटणी घेतल्यानंतर सलग तीन आठवडे पाऊस सुरू होता. परंतु प्रबळ इच्छाशक्ती व तंत्रज्ञानाच्या जोरावर सुपर सोनाका या द्राक्ष व्हरायटीची अत्यंत चांगले उत्पादन त्यांच्या बागेत आलेले दिसत आहे. सावळजमध्ये हंगामाच्या सुरुवातीलाच ३५९ रुपये दर (प्रति ४ किलो) त्यांच्या द्राक्षांना मिळाला आहे.