मुख्यमंत्री शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्यात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ ; शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसला. कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी शिवसैनिकांकडून त्यांच्याविरोधात निदर्शने केली जाणार होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी  शिवसैनिकांची धरपकड सुरु केली.

    कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसला. कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी शिवसैनिकांकडून त्यांच्याविरोधात निदर्शने केली जाणार होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी  शिवसैनिकांची धरपकड सुरु केली. त्यामुळे पोलिसांनी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस संजय पवार यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. यावेळी संजय पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा जोरदार निषेध केला.

    आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. मग तुम्ही दडपशाही का करत आहात, असा सवाल संजय पवार यांनी विचारला. त्यानंतर संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी संजय पवार यांना गाडीत बसवले. तेव्हा संजय पवार यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. हे कार्यकर्ते संजय पवार यांच्या गाडीसमोर आडवे पडले. तर काहीजण त्याठिकाणी ठिय्या देऊन बसले होते. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना एक-एक करून बाजूला करायला सुरुवात केली. या सगळ्यामुळे सध्या कोल्हापुरातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. आता पोलीस संजय पवार आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना किती काळ ताब्यात ठेवणार, हे पाहावे लागेल.

    सत्तार, राठोड यांच्या निषेधार्थ आंदोलन
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी शिवसैनिक व युवा सैनिकांच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामध्ये जिल्हाप्रमुख संजय पवार, हर्षल सुर्वे तसेच युवासेनेचे मंजित माने, उपशहर प्रमुख वैभव जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक आहेत.