rain
संग्रहित फोटो

ठाण्यात (Thane Rain) सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३० वाजेपर्यंत म्हणजेच एकूण नऊ तासात तब्बल १०३.११ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

    ठाणे: मुंबई आणि आजुबाजूच्या भागात पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, ठाणे (Thane Rain) डोंबिवली, वसई आणि नवी मुंबईत पावसाने झोडपून काढले आहे. (Thane Rain Update) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी ठाणे शहराला अक्षरश: झोडपून काढले. अवघ्या दहा तासांमध्ये ठाणे शहरात तब्बल ९५.९४ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. या वर्षातील एका दिवसात सर्वाधिक पावसाची (Rain Record) नोंद आज झाली आहे.

    ठाण्यात सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३० वाजेपर्यंत म्हणजेच एकूण नऊ तासात तब्बल १०३.११ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील वंदना, टेकडी बंगला, भास्कर कॉलनी, उथळसर गवळी वाडा, चितळसर पोलीस ठाण्याच्या आवारात, मुंब्रा ठाकुर पाडा आणि जुना आरटीओ ऑफिस परिसरात आणि इतर ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते.

    सकाळपासून पडणाऱ्या या पावसाचा शहरातील वाहतुकीवर देखील परिणाम झाला. अनेक मुख्य रस्त्यांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. त्यात शहराच्या अनेक भागातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळेदेखील वाहतुकीला ब्रेक लागल्याचे दिसून आले. दुपारी ४ वाजेपर्यंत पावसाचा जोर दिसून आला. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि सखल भागातील पाण्याचाही निचरा झाला आणि वाहतूक काही अंशी रुळावर आल्याचे दिसून आले. दरम्यान मागील वर्षी या दिवसापर्यंत ३१६४.२७ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत २६६३.७५ मिमी पावसाची नोंद झाल्याचे दिसून आले.