cyber crime

  पुणे : उच्चशिक्षित अन् नोकरीच्या शोधात असलेले तरुण त्यासोबतच ज्येष्ठ महिला व नागरिक सायबर चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट असल्याचे दिसत असून, शहरातील एकाच घटनेत पाच तरुणांची टास्कमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिषाने ७ जणांना ५१ लाख ५४ हजार ५७० रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

  पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखविले

  टास्क फ्रॉडद्वारे पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवत ५ जणांना २२ लाख ८७ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात विशाल बबन शिरसाट (वय ३२, रा.चव्हाण नगर, खराडी) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार शिरसाट, राकेश रंजन, शतीश राजेंद्रन, कुणाल रंजन, कोमल भोसले या तरुणांना आरोपींनी व्हाटस्अ‍ॅप आणि टेलीग्रामद्वारे संपर्क साधून पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांना विविध प्रकारचे टास्क दिले. टास्क ते पूर्ण केल्यानंतर काही रक्कम दिली. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर

  तरुणांकडून २२ लाख ८९ हजार ५७० रुपये भरले

  या तरुणांकडून २२ लाख ८९ हजार ५७० रुपये भरून घेतले. यानंतर त्यांना कसलाच परतावा न देता त्यांची फसवणूक केली. तर, दुसऱ्या एका घटनेत अशाच प्रकारे  अरुणकुमार कृष्णकुमार (वय ३२, रा. खराडी) यांना देखील गंडा घालत पेड टास्क देऊन १३ लाख ६५ हजार रुपये भरण्यास भाग पाडत फसवणूक केली आहे. तिसऱ्या घटनेत वाघोली येथे राहणार्‍या सचिन रघुनाथ पिसे (वय ३२) तरुणाची अज्ञात टेलिग्राम धारक व वापरकर्ते यांनी संर्पक करुन टास्क जॉबमध्ये मोठया प्रमाणात फायदा होईल असे सांगत त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडून १४ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

  अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार

  भविष्य निर्वाह निधी कार्यालय दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १० लाख १५ हजार ५०४ रुपयांची फसवणूक केली आहे. डहाणूकर कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांना फोनद्वारे संपर्क साधत चोरट्यांनी दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालय येथून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना तुमची २०१२ पासून ग्रुप इन्शुरन्स पेंडिंग आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर फायन्सास ऑफिसर रवी नायक यांना फोन करण्यास भाग पाडले. फोन केल्यानंतर वेगवेगळी कारणे देत त्यांना बँक खात्यावर १० लाख १५ हजार ५०४ रुपये भरण्यास भाग पाडले.

  फ्लॅट भाड्याने घेण्याच्या बहाण्याने फसवणूक
  सैन्य दलात कार्यरत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने एकाची फ्लॅट भाड्याने घेण्याची बतावणी करत ४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. मिलिटरी अ‍ॅडमिनीस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या नावाचा उपयोग करून रजिस्ट्रेशन करण्याचे खोटे कारण देत ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड येथील ६२ वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांना आशिष कुमार पहाडी नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तो सैन्य दलात कार्यरत असून, त्याला फ्लॅट भाड्याने हवा असल्याचे सांगितले. त्याने मिलेटरी अ‍ॅडमिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधील दिपक बजरंग याचा संपर्क क्रमांक दिला. त्याने भाड्याची रक्क पाठविण्यास रजिस्ट्रेशन करण्याच्या नावाखाली काही रक्कम पाठविण्यास सांगितली. मात्र ती रक्कम मिळाली नसल्याचे सांगून परत पैसे पाठविण्यास सांगत सायबर चोरट्यांनी ४ लाख ४० हजार रुपये उकळले.

  हेल्थ चेकअप कॅम्पच्या नावाने गंडवले
  सैन्य दलातून अधिकारी बोलत असल्याची बतावणीकरून सायबर चोरट्यांनी महिलेला रिक्रुटच्या हेल्थ चेकअपच्या नावे ९९ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी एस.बी.रोड येथील ३३ वर्षीय महिलेने चतुःश्रृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदारांशी संपर्क करत आरोपीने सैन्य दलातील अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. रिक्रुटचे हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन केले असून गेटपासची रिफंड होणारी रक्कम भरण्यास त्यांना सांगितले. महिलेने पैसे भरले. परंतू, नंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

  केवासीच्या बहाण्याने फसवणूक
  केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने तरुणीला सायबर चोरट्यांनी ३ लाख १५ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी विमाननगर येथील ३८ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तरुणी शिक्षीत असून, तिला आरोपींनी फोनकरून बँकेतून बोलत असल्याचे सांगत तिला बँक खात्याची केवायसी अपडेट करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर खात्याची गोपनिय माहिती घेत तरुणीच्या परस्पर खात्यातून पैसे काढून फसवणूक केली