भाजपाच्या खासदाराविना पालघरमधील हिंदुत्व धोक्यात?

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे, नालासोपाऱ्यात घेतली पत्रकार परिषद

    वसई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज वसईमध्ये (Vasai) उपस्थिती दर्शवली. सहनिरिक्षक म्हणून राणे यांनी शनिवारी सकाळी वसईचा दौरा केला. नितेश राणे यांची आज नालासोपाऱ्यामध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे म्हणाले की, भाजपाचा खासदार निवडून आला नाही, तर पालघरमधील हिंदुत्व धोक्यात येईल, हिंदुंना घराबाहेर पडणे मुश्किल होईल असे खळबळ जनक विधान भाजपाचे आमदार आणि पालघर लोकसभेचे सहनिरिक्षक नितेश राणे यांनी नालासोपारात केले.

    आजच्या या वसई दौऱ्यावर त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट, नालासोपारा विधानसभा संघटक राजन नाईक, वसई विधानसभा संघटक मनोज पाटील होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पालघर लोकसभा निवडणूक ही हिंदुत्वाची लढाई आहे. भाजपाचा खासदार निवडून नाही आला तर पालघरमधील हिंदुत्व धोक्यात येईल, हिंदूंना घराबाहेर पडणेही मुश्किल होईल. महाविकास आघाडीला मत म्हणजे लव जिहादला मत देण्यासारखे आहे. पालघरमधील साधु हत्याकांड आणि वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मोदींना सत्तेवर आणावेच लागेल, अन्यथा हिंदूंचे सण ही साजरे करता येणार नाही, असे आवाहन करत नितीश राणे यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर जहरी टिका केली.

    पुढे ते म्हणाले की, मुस्लिम लीगची भाषा उद्धव ठाकरेच्या तोंडातून येत आहे. उध्दव ठाकरे यांचे स्वतःचे घर चालवण्याचे वांदे आहेत. तर ते विकासासाठी निधी कुठून आणणार, आदित्य ठाकरेंनी अगोदर स्वतःच्या कपाळावरील माझा बाप नपुंसक आहे. हा शिक्का पुसावा, नंतर आरोप करावेत अशी टिका करताना साम-दाम-दंड-भेद वापरून आमचा उमेदवार निवडून आणणारच असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर नाना पाटोळे यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे अशी टिका ही त्यांनी यावेळी केली. पालघर मतदार संघातील स्थानिक प्रश्नाबाबत मात्र, त्यांना उत्तरे देता आले नाहीत. अगोदर माहिती घेतो, त्यानंतर तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतो असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.