
इथला ऐतिहासिक रथोत्सव संपूर्ण राज्यासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. बुधवारी (दि.20) इथला 244वा रथोत्सवर साजरा झाला. त्यानिमित्ताने......
मिलिंद पोळ , तासगांव : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इ.स.1883 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. पण त्याच्या 106 वर्ष आधी तासगाव (जि.सांगली) येथील संस्थानिक श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी तासगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. इथला ऐतिहासिक रथोत्सव संपूर्ण राज्यासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे.बुधवारी (दि.20) इथला 244 वा रथोत्सवर साजरा झाला. त्यानिमित्ताने…….
हा गणेशोत्सव फक्त दीड दिवसाचा असतो. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी या गणपतीचे रथोत्सवाने विसर्जन होते. येथील ऐतिहासिक रथोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. ऋषी पंचमीला म्हणजेच गणेशोत्सवातली दुसऱ्या दिवशी गणपतीची मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात रथातून मिरवणूक काढली जाते. राज्यासह कर्नाटकातही या उत्सवाचा नावलौकिक आहे. दोन्ही राज्यातून लाखो भक्तगण या उत्सवाला हजेरी लावतात. ‘मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात, अलौकिक व नयनरम्य सोहळ्यात हा रथोत्सव पार पडतो.
तासगावचे संस्थानिक श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन हे या घराण्यातील पराक्रमी सरदार होते. या घराण्याचे मूळ पुरूष पुण्यश्लोक हरभट (बाबा) पटवर्धन हे होते. ते गणपतीपुळे येथील गणपतीचे फार मोठे भक्त होते. अनेक वर्षांपासून ते दुर्वांच्या रसाचे प्राशन करून श्रींची खडतर आराधना करीत होते. असं म्हणतात की त्यातून त्यांनी विशेष सिद्धी प्राप्त केली होती. त्यांना झालेल्या दृष्टांतानुसार घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकण प्रदेशचा निरोप घेऊन त्यांनी देशांतर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांचा मुक्काम इचलकरंजी इथे झाला. तिथे त्यांची भेट पुण्यातील पेशवे दरबारातील प्रसिद्ध सरदार इचलकरंजीकर घोरपडे यांच्याशी झाली. त्यांनी हरभट बाबांच्या सहा मुलांची पुण्याला पेशवे दरबारी शिफारस करून नोकरी मिळवून दिली.
हरभट बाबांचे एक चिरंजीव म्हणजे रामचंद्रपंत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे परशुराभाऊ. पण परशुराभाऊंना दुदैवाने वडीलांचा सहवास फार कमी लाभला. इ.स. 1746 च्या दरम्यान रामचंद्रपंतांचे देहावसन झाले. त्यानंतर आई, चुलते यांनी भाऊंचा सांभाळ केला. भाऊ संस्कृत पठण, पत्रलेखन आणि मर्दुमकी या क्षेत्रात निपुण होते. इ.स.1755 ते 1799 या काळात सुमारे शंभर लढायांमध्ये त्यांनी पराक्रम गजवला. त्यावेळी ब्रिटीश सेनापती लॉर्ड वेल्स यांनी भाऊंबद्दल गौरोवोद्गार काढले होते.
राजनिष्ठेचा महामेरू, युद्धतज्ञ असल्यामुळे माधवराव पेशवे यांनी पानिपतच्या युद्धानंतर भाऊंना कसबे तासगावची नेमणूक दिली. त्यावेळी भाऊंनी तासगावच्या संस्थानाची मुहूर्तमेढ 1767ला रोवली. 1770 ते 1799 या कालंखंडात भाऊंनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. टिपू सुलतान बरोबरही भाऊंची अनेक युद्धही झाली. याचवेळी मोहिमांच्या निमित्ताने भाऊंना अनेकवेळा कर्नाटक आणि श्रीरंगपट्टनचे दर्शन झाले. तेथील हिंदू मंदिरे आणि गोपूरं पाहून भाऊ आश्चर्यचकित झाले.
पटवर्धन घराणे गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे भक्त होते. भाऊंचे आजोबा हरभट बाबा हे गणपतीपुळे येथे गणपतीचे पुजारी होते. त्यांच्याकडूनच भाऊंना गणेशभक्तीचे बाळकडू मिळाले. दरम्यान 1971 मध्ये भाऊ तासगाव येथे स्थायिक झाले. थोड्याच दिवसात त्यांना गणपतीपुळे येथील गणपतीने स्वप्नात दर्शन दिले. त्यावेळी प्रत्येक वेळी गणपतीपुळेला येऊन दर्शन घेण्याचा त्रास घेण्यापेक्षा तासगाव येथेच माझी प्रतिष्ठापना कर, असे श्रींनी भाऊंना स्वप्नात सांगितले, अशी मान्यता आहे. गणपतीपुळे येथील गणपतीने स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार भाऊंनी कर्नाटक इथून गवंडी, सुतार, शिल्पकार आणि राजस्थानातून चित्रकार आणून 1771 ते 1779 या काळात तासगाव येथे सिद्धीविनायकाचे भव्य मंदीर उभारले.
तासगावच्या गणपती मंदीराची रचना ऐतिहासिक आणि अतिशय भव्य दिव्य आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मोठे प्रशस्त पटांगण आहे. समोर प्रवेशद्वार आणि देवस्थानची कचेरी आहे. शेजारी रथगृह आहे. प्रवेशद्वारावर 7 मजली (96 फूट उंचीचे) राज्यातील एकमेव गोपूर आहे. तेथून पुढे गेल्यावर केंद्रस्थानी पूर्वी कार्यरत असलेली कारंजे दगडी प्रांगण आहे. मंदीराच्या पश्चिम बाजूला नक्षीदार खांबांनी केलेला सभामंडप, पाचही देवतांचे दगडी मंदीर आहे. गोपूर मात्र दगड आणि विटा अशा साहित्यांने युक्त आहे.
भाऊंनी श्रीरंगपट्टण येथे पाहिलेली रथोत्सवाची कल्पना तासगावात आणली. रथोत्सवासाठी प्रथम भाऊंनी तीन मजली लाकडी रथ तयार केला. इ.स. 1779 मध्ये प्रथम त्यांनी तासगावात रथोत्सवाला सुरूवात केली. श्रीं ची प्रतिष्ठापना झाली. तासगावात रथोत्सवाला सुरवातही झाली. मात्र गावची भरभराट झाली तरच गावकरी आणि श्रींचे मानकरी, सार्थक यांचे पाठबळ मंदिराला मिळेल. या जाणीवेतून भाऊंनी व्यापारी, चित्रकार, संगीतकार, मानकरी यांना जमीनी दिल्या.
या रथोत्सवास 242वर्षांची परंपरा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषात भाविक भक्तीभावाने हा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढतात. हा रथ पाच मजली आणि तीस फूट उंचीचा आहे. रथोत्सवाच्या दिवशी गणपती मंदिर ते समोर अर्धा किलोमिटरवर असलेल्या श्री काशिविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथ ओढत नेला जातो. दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान या रथोत्सवास सुरवात होते. राजवाड्यात प्राणप्रतिष्ठापना केलेली मातीची मूर्ती आणि संस्थानची 125 किलोची पंचधातूंची मूर्ती पालखीतून वाजत – गाजत मंदिरात आणली जाते. त्यानंतर तेथे दोन्ही मूर्तींची आरती केली जाते. त्यानंतर जमलेला लाखो भाविकांचा जनसमुदाय गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषात रथ ओढण्यास सुरवात करतो. यावेळी गुलाल व पेढ्यांची होणारी उधळण, युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांझपथक, समोर दिमाखात चालणारी गौरी हत्तीण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झालेलं असतं.
हा रथ काशीविश्वेश्वराच्या मंदीरापर्यंत ओढत नेला जातो. तेथे आरती करून मातीच्या मुर्तीचे कापूर नाल्यात विसर्जन केलं जातं. विसर्जनानंतर पंचधातूंच्या मुर्तीसह मिरवणूक पुन्हा गणपती मंदीराकडे येते. या रथोत्सवाने शहरातील वातावरण मंगलमय झालेलं असतं. बुधवारी होणाऱ्या रथोत्सव पार्श्वभूमीवर भाविकांच्यात आनंदी वातावरण आहे.