गिरिप्रेमी व नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगच्या गिर्यारोहकांनी रचला इतिहास; माउंट मेरू शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला भारतीय

  पुणे : गढवाल हिमालय सप्टेंबर २ गिरिप्रेमी या भारतातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेच्या गिर्यारोहकांनी माउंट मेरू ६६६० मीटर उंच व एव्हरेस्टपेक्षाही आव्हानात्मक शिखरावर यशस्वी चढाई केली. २ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गिरिप्रेमीच्या गणेश मोरे, विवेक शिवदे, वरुण भागवत, मिंग्मा शेर्पा व नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसाई व त्यांचे सहकारी बिहारी राणा व अजित रावत यांनी शिखरावर भारतीय तिरंगा फडकावून इतिहास रचला.

  गिरिप्रेमी व एनआयएमचा संघ हा भारतातील पहिला संघ ठरला

  गिरिप्रेमींची ही मोहीम नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग, उत्तरकाशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. मोहिमेदरम्यान संघाने मेरू शिखराच्या पश्चिम बाजूने चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण असलेल्या नैऋत्य धारेने शिखर चढाई यशस्वी केली. माउंट मेरूच्या दक्षिण शिखरावर चढाई करणारा गिरिप्रेमी व एनआयएमचा संघ हा भारतातील पहिला संघ ठरला असून पश्चिम बाजूने मेरू शिखर चढाई करणारा जगातील पहिला संघ ठरला आहे.

  ‘नमः रोप्स’ यांच्या पाठिंब्यामुळेदेखील मोहीम यशस्वी

  या मोहिमेचे नेतृत्व उमेश झिरपे करत असून दावा शेर्पा, फुर्रतेनसिंग शेर्पा या शेर्पा सहाय्यकांनीदेखील मेरू शिखरावर चढाई केली. लाक्पा शेर्पा यांनी कॅम्प १ (५५०० मीटर उंच) ला थांबून मोहिमेच्या यशस्वीतेत मोलाचा हातभार लागला. उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे प्रिन्सिपल कर्नल अंशुमन भदोरिया व व्हाईस प्रिन्सिपल डॉ. मेजर देवल वाजपेयी यांच्या अनमोल सहकार्याने मोहिमेच्या तयारीत व यशस्वीतेत मोलाची मदत झाली. ‘पी क्यूब एंटरप्राइजेस’चे पार्थ चौधरी, ‘प्राज इंडस्ट्रीज’चे परिमल व प्रमोद चौधरी तसेच ‘वर्ल्ड ऑइलफिल्ड मशीन,’ व ‘नमः रोप्स’ यांच्या पाठिंब्यामुळेदेखील मोहीम यशस्वी होण्यात मदत
  झाली.
  याच वर्षी मे महिन्यामध्ये गिरिप्रेमीच्या संघाने माउंट मेरू मोहीम आयोजित केली होती. मात्र लहरी व खराब हवामानाने संपूर्ण मोहिमेदरम्यान संघाची परीक्षा पाहिली, शेवटी शिखरमाथा अवघ्या २०० मीटरवर असताना संघाला परतावे लागले होते. या मोहिमेतून आलेले अनुभव व शिकवणीचा फायदा यावेळी झाला. संघाचा मुक्काम २५ ऑगस्ट पासून कीर्ती बमक ग्लेशियरवर वसलेल्या बेस कॅम्प (४८०० मीटर) वर होता. हिमालयात सतत होणारा पाऊसामुळे यावेळी देखील हवामान साथ देते की नाही हा प्रश्न गिर्यारोहकांसमोर होता. मात्र, सुदैवाने हवामानाने यावेळी साथ दिल्याने शिखर चढाईसाठी मदत झाली. कॅम्प १ (५५०० मीटर) पासून शिखरमाथ्यापर्यंत संपूर्ण खडी चढाई आहे. यात रॉक क्लायम्बिंग व आईस
  क्लायम्बिंग या दोहोंच्या कौशल्यांची गरज भासते. गिरिप्रेमीच्या निष्णात व निपुण गिर्यारोहकांनी सलग दहा तास चढाई करून कॅम्प १ पासून पुढे शिखरमाथ्यावर चढाई केली व भारतीयच नव्हे तर जगाच्या गिर्यारोहण इतिहासामध्ये नवा अध्याय जोडला.

  या आधी गिरिप्रेमीने जगातील १४ पैकी आठ अष्टहजारी शिखरांना गवसणी घातली आहे. यात एव्हरेस्ट, कांचनजुंगा, अन्नपूर्णा यांसारख्या खडतर शिखरांचा समावेश आहे. सोबतच माउंट मंदा या भारतीय हिमालयातील शिखरावर देखील यशस्वी मोहीम करण्यात गिरिप्रेमीला यश आले आहे. या सर्व मोहिमांचे नेतृत्व उमेश झिरपे यांनी केले असून माउंट मेरू मोहिमेचे यशस्वी नेतृत्व देखील झिरपे यांनी केले. माउंट मेरू शिखरावर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांमध्ये गणेश मोरे (माउंट एव्हरेस्ट व माउंट च्योयु शिखरवीर), विवेक शिवदे (माउंट कांचनजुंगा, माउंट अमा दब्लम, माउंट मंदा शिखरवीर), वरुण भागवत (तरुण गिर्यारोहक, माउंट भ्रिगु पर्वत शिखरवीर), गिरिप्रेमीचे सदस्य व एव्हरेस्टसह विविध अष्टहजारी शिखरांवर अनेकवेळा चढाई केलेले जागतिक कीर्तीचे गिर्यारोहक मिंग्मा शेर्पा व एव्हरेस्ट शिखरवीर व नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसाई यांचा समावेश आहे.
  माउंट मेरू हा तीन शिखरांचा समूह असून दक्षिण, मध्य व उत्तर असे तीन शिखरे आहेत. या शिखरांवर जाण्यासाठी विविध चढाई मार्ग असून जगभरातील विविध देशांतील गिर्यारोहकांनी चढाईचे प्रयत्न केले आहेत. मात्र आजपर्यंत हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच गिर्यारोहकांना चढाई करण्यात यश आले आहे. यात भारतीय गिर्यारोहकांचा समावेश नव्हता. गिरिप्रेमीच्या यशाने भारताचे नाव गिर्यारोहण जगतामध्ये मोठ्या सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.

  माउंट मेरूविषयी उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालयात माउंट मेरू हे शिखर वसलेले आहे. ६६६० मीटर उंच असलेले माउंट मेरू हे थलाई सागर व शिवलिंग या पर्वत शिखरांच्या मध्ये विराजमान आहे. गिर्यारोहण जगतामध्ये ‘एव्हरेस्ट पेक्षाही चढाईसाठी कठीण’ अशी माउंट मेरूची ख्याती आहे. जगभरातील हाडाचे गिर्यारोहक माउंट मेरू शिखरावर चढाई करण्यास मोठ्या तयारीने येतात. मात्र, या शिखराने अत्यंत कमी गिर्यारोहकांना आपलंसं करून शिखर चढाई करण्यात यश मिळू दिले आहे. मेरू पर्वताची एकूण तीन शिखरे आहेत, उत्तर, मध्य व दक्षिण. दक्षिण शिखर ६६६० मीटर उंच आहे. तर मध्य शिखर ६३१० मीटर उंच आहे. उत्तर शिखराची उंची ६४५० मीटर इतकी आहे. मध्य शिखर तिन्ही शिखरांत उंचीने कमी असले तरी चढाईसाठी सर्वात अवघड शिखर तेच आहे.