मुलामुलींच्या शिक्षणासाठी १९५० ला होळकरांनी दिलेली ‘ती’ ऐतिहासिक जागा त्यांच्या कुटुंबियांना परत करणार; शरद पवार यांची ग्वाही

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमादरम्यान आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांना वाफगाव किल्ल्याचे संवर्धन करण्याची गरज असल्याचं बोलून दाखवत या किल्ल्याची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यांनीही ही विनंती मान्य करत या किल्ल्याची पाहणी केली. होळकर कुटुंबीयांनी त्या काळी दिलेली जागा आता परत त्यांच्या कुटुंबियांना परत देऊ, अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिली.

  • म.य होळकर विद्यालयासाठी १ कोटी रुपये देण्याची शरद पवारांची घोषणा

पुणे : श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगाव येथील किल्ल्याची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह होळकर कुटुंबातील भूषण सिंह राजे होळकर व आ. रोहीत पवार (Rohit Pawar)  हे वाफगावला गेले होते. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमादरम्यान आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांना वाफगाव किल्ल्याचे संवर्धन करण्याची गरज असल्याचं बोलून दाखवत या किल्ल्याची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यांनीही ही विनंती मान्य करत या किल्ल्याची पाहणी केली.

होळकर कुटुंबीयांनी परिसरातील मुलामुलींचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी वाफगाव येथील आपली जागा व वाडा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना १९५० साली दिली. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून तिथे रयत शिक्षण संस्थेची म. य होळकर विद्यालय ही शाळा सुरू आहे. होळकर कुटुंबीयांनी त्या काळी दिलेली जागा आता परत त्यांच्या कुटुंबियांना परत देऊ, अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिली.

तिथे उपस्थित असणारे ग्रामस्थ व स्थानिक आमदार यांना शरद पवार यांना विनंती केली की मुला-मुलींचे शिक्षण सुद्धा महत्त्वाचे आहे त्यामुळे आसपासच्या भागात आपण जागा पाहून त्या ठिकाणी नवीन शाळेच्या इमारतीची उभारणी करू. ग्रामस्थांनी देखील जागा देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे यावेळी त्यांनी आवाहन केले. ३ कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी नवीन शाळा उभारली जाणार असून त्यातील १ कोटी रुपये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येतील, अशी घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली. उर्वरित २ कोटी रुपयांमध्ये स्थानिक ग्रामस्थ स्थानिक आमदार दिलीप मोहिते व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही वाटा उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान संबंधित वाफगावचा वाडा हा लवकरात लवकर होळकर कुटुंबियांना परत दिला जाईल अथवा जर त्यांनी सांगितले तर तो सरकारला देखील देण्यात येईल व नंतर त्या ठिकाणी विकास आराखडा बनवून सरकारच्या मदतीने निधी देखील उपलब्ध केला जाऊ शकतो.