गृहमंत्री अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर ; सहकार विभागाच्या पोर्टलचे करणार उद्घाटन

केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा हे रविवारी (दि. ६) पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या एका पोर्टलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या वेळी देशभरातील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठकही होणार आहे.

    पुणे :  केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा हे रविवारी (दि. ६) पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या एका पोर्टलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या वेळी देशभरातील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठकही होणार आहे. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

    केंद्र सरकारच्या सहकार विभागातर्फे सहकारी संस्थांना व्यवसाय सुलभता करण्यासाठी (ईज ऑफ डुईंग बिझिनेस) साह्य व्हावे, यासाठी केंद्रीय सहकारी संस्थांच्या निबंधकांनी तयार केलेल्या ‘सहकार से समृद्धी’ या पोर्टलचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार, विशेष सचिव विजय कुमार हेही उपस्थित असतील. या वेळी देशभरातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधीही हजेरी लावणार आहेत.