जालना जिल्ह्यात ऑनर किलिंग, वडील अन् काकाने केला गळफास देऊन मुलीचा खून; ‘हे’ होतं कारण

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. घरात काहीही न सांगता नातेवाईक मुलासोबत मुलगी ३ दिवस घराबाहेर गेली. यामुळे समाजात अपमान झाल्याचे सांगत संतापलेल्या वडिलांसह चुलत्याने मुलीचा झाडाला गळफास देऊन खून केला.

    जालना : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. घरात काहीही न सांगता नातेवाईक मुलासोबत मुलगी ३ दिवस घराबाहेर गेली. यामुळे समाजात अपमान झाल्याचे सांगत संतापलेल्या वडिलांसह चुलत्याने मुलीचा झाडाला गळफास देऊन खून केला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

    दरम्यान यानंतर मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करत अंत्यविधी करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला. ही घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे बुधवारी उघडकीस आली. सूर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे (१७) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी वडील आणि काकाला अटक झाली आहे.

    सुरेखा सरोदे ही तीन दिवसांपासून घरातून निघून गेली होती. काही न सांगता मुलगी गेल्याने अपमानित झालेल्या वडील व चुलत्यानेच तिचा खून केल्याचे तपासात समोर आले. चंदनझिरा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तागवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    लिंबाच्या झाडाला गळफास दिला

    ​​​​​​मुलगी नातेवाइकाच्या मुलासोबत पळून गेल्यामुळे समाजात बदनामी झाली म्हणून वडील व चुलत्याने सूर्यकलाला लिंबाच्या झाडाला गळफास दिला. नंतर तिने आत्महत्या केली असे भासवून सायंकाळी अंत्यविधीही उरकला. परंतु, पोलिसांच्या चौकशीत मुलीचे वडील व चुलते अनुक्रमे संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे यांनी तिचा खून केल्याचे समोर आले.