महाबळेश्वरमध्ये घोड्यावरुन सैर करण्याचा मोह आला अंगाशी, अचानक घोडा उधळला; पर्यटकासह घोडा दरीत कोसळला

महाबळेश्वमध्ये एका पर्यटक घोड्याची सैर करण्यासाठी निघाला. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर घोडा उधळला आणि थेट दरीत कोसळला. या दुर्घटनेत पर्यटक आणि घोडा दोघंही जखमी झाले आहेत.

    सातारा : हिवाळ्यात महाराष्ट्रातील आवर्जून भेट द्यावसं वाटणारं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर (Mahableshwar). निसर्गाची मुक्त उधळण पाहण्यासाठी हजारो पर्यटक इथे येतात. त्यात फिरण्यासोबत घोड्यावर बसून सैर करण्याचा मोह अनेकांना होतो. पण हाच मोह एका पर्यटकाच्या जिवावर बेतला आहे. महाबळेश्वरमधी प्रसिद्ध लॉडविक पाँईंट येथे घोड्यावरुन सैर करताना (Horse Riding) पर्यटकासह घोडा दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत घोडा आणि पर्यटक दोघेही जखमी झाले.

    नेमकं काय घडलं?

    महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी घोड्याची सैर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. येथील लॉडवीक पाँईंटवर घोड्याची सैर मारण्यासाठी एक गृप आला होता. त्यातील एक घोड्यावर पर्यटक सैर करण्यासाठी बसला आणि मात्र काही अंतरावर गेल्यानंतर घोडा उधळला. त्याचा वेग अचानक वाढला आणि वेगात दरीच्या टोकावर गेला. त्यावेळी घोड्याचा पाय घसरला आणि घोडा दरीत कोसळला. या घटनेनंतक सगळीकडे एकच खळबळ उडाली. सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पर्यटक आणि घोडा दोघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेत दोघंही किरकोळ जखमी झाले आहेत.

    पर्यटकांच्या सुरक्षेबाबत काय?

    महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. विशेषत हिवाळयात महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ होते. महाबळेश्वरमध्ये  घोड्यावरील सैर हे कायम मुख्य आकर्षण असते. घोड्यावरून पडून कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी हेल्मेट, नीपॅडसह अत्यावश्यक गोष्टी घोडे व्यावसायिकांनी पुरवणे आवश्यक असते. पण या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते. पर्यटकांच्या सुरक्षिततचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र पाहायला मिळते. कालच्या घटनेनंतर महाबळेश्वर पोलीस अलर्ट झाले असून आता नववर्षाच्या स्वागातासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असेल त्यावेळी अनर्थ घडू नये यासाठी सूचना दिल्या जाणार आहे.