Hotel waiters and vehicle thefts, increase in theft incidents in Pune, read detailed report

  पुणे : हॉटेलमध्ये वेटरचे काम करताना विश्रांतवाडी, चंदननगर तसेच हडपसर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या वाहनचोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून २ लाखांच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. चंदननगर पोलिसांनी शेल पेट्रोलपंपाजवळ केली आहे.
  या पोलिस पथकाकडून कामगिरी
  ही कामगिरी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मनीषा पाटील, पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अरविंद कुमरे यांच्या पथकाने केली.
  तुकाराम ईश्वर आव्हाळे (वय २२, रा. जोगेश्वरी हॉटेल, खराडी, मुळ रा. मु.पो. राचन्नावाडी ता. चाकुर जि. लातुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत बळीराम संजय बेळगे (वय २७, रा.खराड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
  शहरात वाहनचोरीचे प्रमाण लक्षणीय आहे. दरम्यान, चंदननगर येथील बळीराम बेळगे यांची दुचाकी (एमएच २६ अेझेड ०१५२) २४ जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरासमोरून चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. तेव्हा पोलीस अंमलदार कोद्रे व जाधव यांना माहिती मिळाली की, दुचारी चोरणारा व्यक्ती दुचाकी घेऊन शेल पेट्रोलपंप येथे येणार आहे.
  दुचाकी चोरीची कबुली
  त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. दुचाकीबाबत सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मागिल तीन ते चार महिन्यांपासून विश्रांतवाडी, चंदननगर, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे सांगितले.
  पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस
  आरोपीने चोरलेल्या दुचाकी ज्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या त्या ठिकाणावरुन ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीकडून १ लाख ९५ हजार रुपयांच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीकडून चंदननगर पोलीस ठाण्यातील दोन आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.