सातपूर परिसरात हॉटेल कामगाराची हत्या नंतर तिसऱ्या मजल्यावरून पडल्याचा केला बनाव

सातपुरच्या कामगार नगर भागातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मध्यरात्रीच्या सुमारास खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.1) सकाळी उघडकीस आला. अज्ञात आरोपींनी हॉटेल कामगाराचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला.

    नाशिक : सातपुरच्या कामगार नगर भागातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मध्यरात्रीच्या सुमारास खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.1) सकाळी उघडकीस आला. अज्ञात आरोपींनी हॉटेल कामगाराचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. परंतु पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ही बाब सुटली नाही. शवविच्छेदनात कामगारावर तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करून तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याचे स्पष्ट झाले.

    शहरात गेल्या आठवड्यात सुरू झालेली खूनाची मालिका काहीशी खंडीत झाल्याचे वाटू लागताच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी सातपुरमध्ये खूनाची घटना उघडकीस आली. कामगार नगर येथील रिलायन्स पेट्रोलपंपा जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये कूकचे काम करणारा महेंद्र सिंग (वय २७) हा कामगार सातपुरच्या कौशल्या व्हिला या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहात होता. मूळ नेपाळचा असलेल्या हा कामगार रात्री हॉटेलचे काम आटोपून घरी गेल्यानंतर मध्यरात्री त्याच्यावर तीक्ष्ण हत्याऱ्याने हल्ला करण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी झालेला असताना मारेकऱ्यांनी त्याला तिसऱ्या मजल्यावरून लोटून दिले.

    सोमवारी (दि.१) सकाळी हा कामगार इमारतीखाली पडलेला दिसल्यावर त्याने उडी मारून आत्महत्या केल्याचे मानले गेले. मात्र, घटनास्थळी पोलीस येताच त्यांनी केलेल्या पाहणीत महेंद्र सिंग याच्या अंगावर तीक्ष्ण हत्याऱ्याने भोसकल्याच्या खूना दिसून येताच, त्याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.