‘कालपर्यंत ज्यांना तुम्ही विठ्ठल मानत होता ते हुकूमशाह झाले कसे?’; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटाला सवाल

'निवडणूक आयोगात झालेल्या वादविवादात खास काही मुद्दे मांडले गेले नाहीत. परंतु, एक मुद्दा वारंवार मांडला गेला तो अतिशय वेदनादायी होता. एकवेळ अशी आली की, 'माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

    मुंबई :  ‘निवडणूक आयोगात झालेल्या वादविवादात खास काही मुद्दे मांडले गेले नाहीत. परंतु, एक मुद्दा वारंवार मांडला गेला तो अतिशय वेदनादायी होता. एकवेळ अशी आली की, ‘माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले. कालपर्यंत ज्यांना तुम्ही विठ्ठल मानत होता ते हुकूमशाह कसे झाले, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केला. यावेळी ते भावूक झाले होते.

    जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तर दिले. ते म्हणाले की, मी कालपर्यंत एका गोष्टीवर विश्वास ठेवायचो की या सगळ्यांचे दैवत शरद पवार आहेत. पण, म्हणजे शरद पवार यांना हुकूमशाह म्हणणे म्हणजे, कालपर्यंत ज्यांना विठ्ठल म्हणत होतो, त्यांच्यावर टीका करणे असे आहे. ते आमचे दैवत आहेत, त्यांच्याविषयी काहीच नाही म्हणायचे. आज त्यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही कसे म्हणून शकला की पचार हुकूमशाह आहेत? पवार लोकशाही न मानणारे आहेत? हे तुमचे वकील कसे काय म्हणून शकले, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

    तसेच मला त्या वकिलाचे बोलणे ऐकून आपण कशासाठी लढतोय असं वाटलं. कुठली नीती कुठली मूल्य, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. घरात बसल्यावर त्यांना फोन यायचे तुम्हाला मंत्री केले. शपथ घ्या अशी स्थिती होती. शरद पवार यांच्या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याचे त्यांना काय फळ मिळाले? महाराष्ट्रातील एका माणसाला हे वाक्य पटतंय का ते सांगाव?, असा सवालही आव्हाड यांनी यावेळी केला.