विकासाचे मारेकरी निवडणुकीचा वेळी एकत्र कसे आले? सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना सवाल

डोंबिवली शिवसेना शाखेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यावर राजकीय हल्लाबोल करण्यात आला आहे.

    सत्तेतील शिवसेना भाजप मत मागण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरीत सरकारी उपक्रम राबवित आहेत अशी घणाघाती टिका शिवसना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. डोंबिवली शिवसेना शाखेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यावर राजकीय हल्लाबोल करण्यात आला आहे.

    आचारसंहिता लागण्यापूर्वी शिवसेना भाजप सरकारकडून विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप केले जात आहे. काही दिवसांपूर्वी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम डोंबिवली प्रिमिअर ग्राऊंडवर आयोजित केला होता. त्यानंतर काल सायंकाळी चक्कीनाका परिसरातील मैदानावर शिल्लाई मशीन आणि घरघंटीचे वाटप करण्यात आले. यावेळी शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकारी छाया वाघमारे यांनी आवाहन केले की, खासदार शिंदे यांना मतदार करा. याबाबत ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी सांगितले की, सरकारी यंत्रणेचा वापर मते मिळविण्याकरीता केला जात आहे. प्रशासनाला नोकर बनवून टाकले आहे. ही बाब देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. कल्याण पूर्वेत गोळीबाराचा प्रकार घडला. शिंदे गट आणि भाजप आमदार यांच्या धूसफूस सुुरु होती.

    गणपत गायकवाड यांच्यासारख्या खमक्या आमदारावर अशी परिस्थिती यावी. त्याला पोलीस ठाण्यात बसून गोळीबार करावा लागला. हा विषय दोन्ही बाजूने पाहिले पाहिजे. त्यांच्यावर ही वेळ कोणी आणली. ही बाब विचारात घेतली पाहिजे. रवी चव्हाण हे जे बाेंबलत होते. ५११ कोटीचा निधी आणला आहे. त्या आधी त्यांनी कल्याण डोंबिवलीचे विकासाचे मारेकरी शिंदे असा फलक लावला होता. आता असे काय झाले. त्यातले किती पैसे आणले. गाजर दाखविणे सुरुच आहे. कितीही गाजरे दाखविली तरी कल्याण डोंबिवलीचा सुज्ञ नागरीक तुम्हाला तुमची जागा दाखविणार. तुमच्याकडे किती ही आमाप खोऱ्याने पैसा असला तरी त्याचा काही एक उपयोग निवडणुकीत होणार नाही असे खामकर यांनी सांगितले.