Maratha Reservation
Manoj Jarange's counter attack on Chhagan Bhujbal

मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील कावळे या व्यक्तीने मुंबईत आज आत्महत्या केली. यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली असून सरकारवर हल्लाबोल चढविला आहे.

    काय म्हणाले जरांगे पाटील?

    “सरकारने बळी घ्यायचं का ठरवले आहे हे कळत नाही. सरकारमुळे बळी पडायला लागले आहेत. भावांनो आरक्षण मिळणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. खूप वर्ष दम धरला आहे. थोडे दिवस आणखी दम धरा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो पोरं जायला लागले, आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? तुम्ही दम धरा. पण हे सगळं पाप सरकारचं आहे. सरकारला किती मुडदे पाडायचे आहेत माहीत नाही. एक माणूस कमी झाला. याला पूर्ण जबाबदार सरकार आहे. आता तरी त्याचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने आता तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. २४ तारखेनंतर होणारं आंदोलन सरकारला परवडणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.

    “या आत्महत्येला फक्त सरकार जबाबदार आहे. आमच्या हक्काचा असणारा विषय ताबडतोब मिटवला तर ही वेळ येणारच नाही. मराठा समाजाचा अंत सरकारने पाहू नये. बलिदान वाया जाऊ देणार नाही. २४ तारखेनंतर होणारं शांततेचं आंदोलन सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. असं काही ऐकल्यानंतर खूप वेदना होतात. या वेदना थोडे दिवस सहन करा. पाया पडून सांगतो कोणी आत्महत्या करू नका. आमच्या परिवारातील आमचा भाऊ गेला आहे. आमचा माणूस गेला आहे तो परत येणार नाही. सरकारने तातडीने आरक्षण द्या. २४ तारीख उजाडू देऊ नका. आम्ही मराठे हे बलिदान वाया जाऊ देणार नाही”, असंही ते म्हणाले.

    मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे या व्यक्तीने मुंबईत आज आत्महत्या केली असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिली. यावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाचा लढा गेल्या काही दिवसांपासून तीव्र होत जातोय. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण आणि महाराष्ट्र दौऱ्यामुळे मराठा आंदोलक आणखी पेटले आहेत. त्यातच, आज एकाने आत्महत्या केल्याने हे मराठा आंदोलक अधिक तीव्रतेने सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे