नवराष्ट्र स्पेशल! महामार्गाचा मार्ग मार्गी लागणार? किती वर्ष रखडलाय मुंबई-गोवा हायवे?, जाणून घ्या कोकणवासियांची व्यथा…

मुंबई पुण्याहून चाकरमानी आपल्या गावी सणांसाठी जातात तेव्हा त्यांना खड्डातून मार्ग काढत गावी पोहचावे लागते. दरवर्षी गणपती व होळीला कोकणी माणूस हमखास आपल्या गावी जातात, अशावेळी त्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट असल्यानं त्यांचे खूप हाल व त्रास होत आहे. कारण पावसात होणारे खड्डे, गाडीच्या तिकिटासाठी आधीच होणारी मारामारी, त्यात प्रवासात या मार्गावर येणारे अनेक अडथळे यामुळं कोकणवासिय त्रस्त झाले आहेत.

    रत्नागिरी : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आहेत, यावेळी मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक घेणार आहेत. दरम्यान, बहुचर्चित व बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा महामार्गाचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लावणार का? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्ग ज्याला NH66 म्हणूनही ओळखले जाते, हा चार पदरी महामार्ग आहे, जो नवी मुंबईतील पनवेल ते गोव्याला जोडतो. ती पुढे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधून पुढे जाऊन कन्याकुमारी, तामिळनाडू येथील केप कोमोरिन येथे विस्तारते आणि संपते.

    दरम्यान, १२ वर्षांहून अधिक काळ दुरवस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची व्यथा महामार्गाचा वनवास आणि या महामार्गाचे दुष्टचक्र संपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले असून, ते हा प्रश्न मार्गी लावतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोकणवासियांना गोव्याकडून कोकणात जाण्यासाठी कोल्हापूरमार्गे जायला लागते. गेली कित्येक वर्षे हा रस्ता पूर्ण होण्याची वाट पहात आहे. गेल्या अनेक वर्षांतील केंद्र व राज्य दोन्ही सरकारे गांभीर्यपूर्वक या रस्त्याच्या कामात लक्ष घालत नसल्याने, तसेच दंडात्मक कठोर कारवाई करण्यात येत नसल्यानेच आम्हां कोकणवासीयांचे हाल होत आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ एवढ्या कमी वेळात होऊ शकतो तर आमचा का नाही होत? अशा संतप्त प्रतिक्रिया कोकणवासियांनी दिल्या आहेत.

    दुसरीकडे मुंबई पुण्याहून चाकरमानी आपल्या गावी सणांसाठी जातात तेव्हा त्यांना खड्डातून मार्ग काढत गावी पोहचावे लागते. दरवर्षी गणपती व होळीला कोकणी माणूस हमखास आपल्या गावी जातात, अशावेळी त्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट असल्यानं त्यांचे खूप हाल व त्रास होत आहे. कारण पावसात होणारे खड्डे, गाडीच्या तिकिटासाठी आधीच होणारी मारामारी, त्यात प्रवासात या मार्गावर येणारे अनेक अडथळे यामुळं कोकणवासिय त्रस्त झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडण्याची कोकणातील लोकप्रतिनिधींनी दिलेली कारणे आपण १० जुलै रोजी छापली आहेत. ज्यामध्ये आमच्या लोकप्रतिनिधींनी त्यांची हतबलता मान्य केली आहे. मात्र सोबत नेहमीप्रमाणे एकमेकांवरही दोषारोप केले आहेतच. पण यात आमचे कोकणवासियांचे अतोनात हाल होताहेत असं कोकणवासियांनी म्हटले आहे.

    मुंबई-गोवा महामार्ग हा NH 66 1,608 किमी लांब आहे. ४७१ किलोमीटर लांबीच्या मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या १२ वर्षांपासून सुरू आहे. 2011 मध्ये सुरू झालेला रुंदीकरण प्रकल्प रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाची 11 पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असले तरी, इंदापूर-वडपाळे, परशुराम घाट-आडवली, आडवली-संगमेश्वर आणि संगमेश्वर ते लांजा या चार भागांचे काम अद्याप बाकी आहे. सध्या मुंबई आणि गोवा दरम्यानचा प्रवास 13 तासांच्या जवळपास आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रकल्प पूर्ण झाल्याने प्रवासाचा वेळ आठ ते नऊ तासांवर येणार आहे. त्यामुळं अनेक वर्षापासून हा महामार्ग प्रलंबित आहे, या महामार्गाचा प्रश्न मुख्यमंत्री तरी मार्गी लावणार का? याकडे कोकणवासियांच्या आशा लागल्या आहेत.