अवकाळी पावसानं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी सांगितला आकडाच.

नुकसानीची २४ तासांत कृषी आणि महसूलचे अधिकारी संयुक्त पंचनामे पूर्ण करतील आणि पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा शासनाकडून केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

    छत्रपती संभाजीनगर : वादळी वाऱ्यामुळे व झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले नगदी पीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अवकाळी पावसासोबतच झालेल्या गारपीठमुळे राज्यातील सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीची २४ तासांत कृषी आणि महसूलचे अधिकारी संयुक्त पंचनामे पूर्ण करतील आणि पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा शासनाकडून केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

    सत्तार म्हणाले की, अतिवृष्टी, संततधार, परतीचा पाऊस आणि आता अवकाळी, गारपीठ अशा प्रकारे सहा महिन्यात चाैथ्यांना शेतीमालाचे नुकसान झाले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या झालेल्या अवकाळी आणि गारपीठमुळे राज्यात सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकाचे तर मराठवाड्यातील ११ हजार १६६हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ५ हजार ९५६ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आम्ही ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला नाही, त्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले आहेत. आतापर्यंत ७०टक्के पंचनामे झाले आहेत. २४ तासांत उर्वरित पंचनामे पूर्ण होतील आणि पुढील १० दिवसांत बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय राज्यसरकार घेईल, असे त्यांनी नमूद केले.

    गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तशीच मदत गारपीठमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासन देईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. प्राप्त होणारी पंचनामे वस्तूनिष्ठ आहे अथवा नाही, याबाबतची पडताळणी कृषी आयुक्त आणि महसूल आयुक्त संयुक्तपणे २४ तासांत करतील. यानंतर शेतकऱ्यांना नूकसान भरपाई देण्याची कार्यवाही शासनाकडून होईल.