क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारासाठी शंभर कोटींचा निधी; अजित पवार यांची माहिती

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी. तसेच भिडेवाडा येथे शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक बांधण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

    पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी. तसेच भिडेवाडा येथे शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक बांधण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

    राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयाेजित केली हाेती. यावेळी त्यांनी ही माहीती दिली. या बैठकीपुर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी सकाळी साडे सहा वाजता भिडेवाडा आणि महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली.

    या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी तर भेटीच्या ठिकाणी दिपक मानकर, रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

    स्मारकासाठी आलेल्या आराखड्याच्या विविध पर्यायांवर विचार करून चांगला पर्याय निवडण्यात येईल. स्मारक विस्तारासाठी जागा संपादन आणि तिथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे नियोजन करण्यात यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

    भिडेवाडा स्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा विचार करावा. जागेची मर्यादा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा. याबाबत लवकरच बैठक घेऊन आराखड्याचे स्वरूप निश्चित करता येईल. स्मारकाची इमारत बाहेरून जुन्या काळातील वाटेल आणि आतल्या बाजूने सुसज्ज असेल, अशी व्यवस्था करावी. भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक प्रेरणादायी ठरावे यासाठी स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरक कार्य आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांचा अंतर्भाव असावा. या स्मारकासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच या भागातील पार्कींगची समस्या साेडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचना पवार यांनी दिल्या.