Hundreds of houses collapsed in Mokhadya in Palghar during stormy rains; death of one; Literally wind up the orchards

  पालघर, मोखाडा : पालघरमधील मोखाडा तालुक्यात सलग ५ दिवसांपासून अवकाळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बुधवारी सातुर्ली येथील नामदेव जाधव (वय. ६२) हे सायंकाळी शेताकडे फेरफटका मारायला गेले असता अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आपल्या शेतातील घरात थांबले असता संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले. यात ते ढिगाऱ्याखाली दडपले व त्यातच त्यांचा करुण अंत झाला. शेताकडे दुसरे कोणीही नसल्याने त्यांना कोणतीही मदत होऊ शकली नाही. उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने घरच्यांनी शेताकडे जाऊन पाहिले असता ही दुर्घटना उघडकीस आली आहे. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

  जाधव कुटुंबीयांचे सांत्वन

  मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले यांनी सातुर्ली येथील दुर्घटना स्थळाला भेट देऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. तसेच, नामदेव जाधव यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून योग्य ती मदत मिळण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकारी पालघर यांना मोखाडा तहसीलदार कार्यालयाकडून पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार कचेरीकडून मिळाली आहे. त्याचबरोबर तालुक्यात अवकाळीने अक्षरशः हैदोस घातल्याने बुधवारी अखेर शंभरच्या आसपास घरांची अंशतः पडझड झालेली आहे. तर आंबा फळबागांची अतिशय नासधूस झालेली आहे.

  आंब्याच्या बागेचे अतोनात नुकसान

  मौजे वाशाळा येथील जयराम गाटे, देवराम कडू, विठ्ठल डगळे, देवीदास डगळे, शंकर डगळे, हिराजी डगळे हिरु कोरडे, पुंडलिक फाळके, चप्पलपाडा येथील वामण गांगड यांच्या आंब्याच्या बागेचे अतोनात नुकसान झाले असून, काही शेतकऱ्यांचे तर ट्रक भर फळं जमीनदोस्त झालेले आहेत.

  चप्पलपाडा येथील सदाशिव वाघ यांच्या दुमजली घराचे छप्पर उडाल्याने साठवून ठेवलेले २ कणगे भात भिजून गेले आहे. मडक्याचीमेट येथील ५ घरे व एका शाळेचे पत्रे तर ३०० मीटर दूर उडवून नेले आहेत. इतका वाऱ्याचा वेग होता. सुदैवाने या परिसरात कोणी गुराखी अथवा शेतकरी नसल्याने मोठ्या प्रमाणावरील जीवितहानी टळली आहे. तसेच, वाशाळा येथील माध्यमिक शाळेची तर अक्षरशः धुळधाण उडवली असून, एकाही इमारतीवर छप्पर म्हणून राहिलेले नाही. त्यालाच लागून असलेल्या वाशाळा पैकी वडपाडा येथेही ३ घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

  डोक्यावरील छप्पर हरवल्याने जनजीवन उद्ध्वस्त

  सातुर्ली येथील नामदेव जाधव यांच्या जीवितहानी बरोबरच आणखी ५ घरांची अंशतः पडझड झालेली आहे. तर सावर्डे येथेही १२ घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील रहिवाशांची पाचावर धारण बसली असून “अरे वरुणा करुणकरा छप्पर वाचवा” असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या अवकाळीने जित्राबांचाही बळी घेतला असून पोशेरा पैकी ठाकूरवाडी येथील रामदास वारघडे यांचा १ बैल व धोंडमाऱ्याचीमेट येथील एका शेतकऱ्याच्या २ शेळ्या व एका बोकडाचा मृत्यू झाला आहे.

  प्रत्येक आपत्तीग्रस्तांना रोख स्वरूपात आर्थिक मदत
  दरम्यान, पालघर जिल्हापरिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष चोथे, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, जि.प.सदस्या सारीका निकम, माजी जि.प.गटनेते दिलीप गाटे, बेबीताई बर्फ यांच्यासह वाशाळा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य समितीने दुर्घटना स्थळांना भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी संतोष चोथे यांनी प्रत्येक आपत्तीग्रस्तांना रोख स्वरूपात वैयक्तिक आर्थिक मदत केली आहे.