लोणंद येथील अतिक्रमण मोहिमेत शेकडो खोकी झाली जमीनदोस्त

लोणंद येथे मंगवार (दि.२८) आणि बुधवार (दि.२९) रोजी पालखी सोहळा दोन दिवसांसाठी मुक्कामी येत आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लोणंदमधील पालखी मार्गावरील तसेच पुणे-सातारा रोड, शिरवळ रोड व खंडाळा रोडवरील व्यापाऱ्यांनी तसेच खोकीधारकांनी केलेली अतिक्रमण काढण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुरू ठेवण्यात आली.

  लोणंद : लोणंद येथे मंगवार (दि.२८) आणि बुधवार (दि.२९) रोजी पालखी सोहळा दोन दिवसांसाठी मुक्कामी येत आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लोणंदमधील पालखी मार्गावरील तसेच पुणे-सातारा रोड, शिरवळ रोड व खंडाळा रोडवरील व्यापाऱ्यांनी तसेच खोकीधारकांनी केलेली अतिक्रमण (Encroachment Operation) काढण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुरू ठेवण्यात आली. २१ जून रोजी पालखी तळावर सकाळी ७ वाजताच मोहिमेला सुरूवात करण्यात आली.

  खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी व पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दोन जेसीबीच्या साह्याने जोरदार धडक कारवाई करण्यात आली.

  यामध्ये रस्त्याच्या कडेला व्यापाऱ्यांचे आलेले ओटे, बोर्ड तसेच दुकानापुढील शेड काढण्यात आली.
  लोणंदमध्ये प्रथमच एवढी मोठी अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. आंबेडकर चौकातील साई मंदिराजवळील, एसटी स्टँड समोरील, शिरवळ रोडवरील अशा एकूण 60 ते 70 खोकी जमीनदोस्त करण्यात आली.

  उद्याही अतिक्रमण मोहिम राबविण्यात येणार असून, लोणंद शहरातील शासकीय जागेवर असणारी अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.

  – दशरथ काळे, तहसीलदार.

  अतिक्रमण काढले गेलेल्या लोकांंची उपजीविका त्याच व्यवसायावर अवलंबून होती. त्यांचा संसार आता उघडा पडला आहे. त्यासाठी नगरपंचायतीने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खोकीधारक परिवाराची आहे.