
पसरणी (ता.वाई) येथे फोन न उचलण्याच्या कारणावरून पतीने संतप्त होऊन पत्नीच्या मानेखाली तसेच दोन्ही हाताच्या मनगटावर ब्लेडने वार (Husband Attack on Wife) केले. या पतीने पत्नीवर ब्लेडने जवळपास ७ ते ८ वार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
वाई : पसरणी (ता.वाई) येथे फोन न उचलण्याच्या कारणावरून पतीने संतप्त होऊन पत्नीच्या मानेखाली तसेच दोन्ही हाताच्या मनगटावर ब्लेडने वार (Husband Attack on Wife) केले. या पतीने पत्नीवर ब्लेडने जवळपास ७ ते ८ वार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
प्रियांका राहुल येवले (वय ३२) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांनी पती राहुल बाळकृष्ण येवले (वय ३५) याच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना पसरणी येथे पहाटे साडेपाच वाजता घडली. राहुल येवले व पत्नी प्रियांका येवले हे दोघेही वाई येथे वेगवेगळ्या कंपनीत नोकरीस आहेत. घटनेच्या आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळी त्याने पत्नी प्रियांकाला फोन केला असता तिने तो उचलला नाही. या रागातून घरी आल्यावर दोघांमध्ये वाद झाला.
पहाटे दुसऱ्या दिवशी कामावर जाताना पुन्हा त्यावरून वाद झाला आणि राहुलने कपाटातील ब्लेड घेऊन तिच्या मानेवर व मनगटावर ब्लेडने ७ ते ८ सपासप वार केले. प्रियांका गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी वाईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राहुल येवले याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.