पत्नीच्या सरंपच पदाचा प्रचार करताना पतीचा स्टेजवर कोसळून मृत्यू

लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अमर पुंडलिक नाडे (वय 45 वर्ष) यांचे आकस्मात निधन झाले आहे.

    लातूर : लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अमर पुंडलिक नाडे (वय 45 वर्ष) यांचे आकस्मात निधन झाले आहे. मयत अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मुरुड शहरातील सार्वजनिक चौकात त्यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती.

    पॅनेलप्रमुख म्हणून नाडे यांनी भाषण केले व ते व्यासपीठावरील पत्नी अमृता यांच्या शेजारील खुर्चीत विराजमान झाले. त्यानंतर थोड्या वेळातच नाडे यांनी मान टाकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेत धावपळ सुरू झाली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली.

    नाडे यांच्यावर गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. नाडे यांच्या मागे पत्नी अमृता, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.