man killing wife

दोनवडे येथील एकनाथ पाटील आणि पत्नी अश्विनी या दाम्पत्याला दोन मुली आहेत. असे असतानाही मुलगा हवा यावरून पती-पत्नीमध्ये कायम वाद होत होता. याच वादातून पती एकनाथकडून अनेकदा अश्विनीचा शारीरिक, मानसिक छळ ही केला जात होता.

    कोल्हापूर : दोन मुलीच झाल्याने रागावलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना करवीर(Karvir) तालुक्यातील दोनवडे येथे घडली आहे. अश्विनी पाटील (Ashwini Patil) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. एकनाथ पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी एकनाथ पाटीलला अटक केली आहे. एकनाथ यांनी पत्नीची गळा दाबून हत्या केल्यावर वीजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी हत्येचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या.  (Kolhapur Crime)

    मुलावरून वाद
    मिळालेल्या माहितीनुसार, दोनवडे येथील एकनाथ पाटील आणि पत्नी अश्विनी या दाम्पत्याला दोन मुली आहेत. असे असतानाही मुलगा हवा यावरून पती-पत्नीमध्ये कायम वाद होत होता. याच वादातून पती एकनाथकडून अनेकदा अश्विनीचा शारीरिक, मानसिक छळ ही केला जात होता. नेहमीप्रमाणे आज पहाटे देखील वंशाच्या दिव्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला. याच वादातून एकनाथ पाटीलने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

    अपघाती मृत्यूचा बनाव
    पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी शॉक लागल्याने पत्नीचा मृत्यू झाला, असा बनाव त्याने रचला. मात्र दक्ष नागरिकांमुळे त्याचा हा बनाव लगेच उघड झाला. गावातील नागरिकांनी एकनाथला चोप दिल्याने त्याने हत्येची कबुली दिली. त्यामुळे घडलेला सगळा प्रकार समोर आला. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेच्या हत्येत पतीसह सासू, सासऱ्यांचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपी एकनाथला त्यांनी ताब्यात घेतलं आहे.

    पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना होत असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वंशाला दिवा हवा म्हणून जर बायकांच्या हत्या होत असतील तर हे  विचारांचं मागासलेपण आहे, असंच म्हणावं लागेल. मुलगा – मुलगी समान आहेत, हा विचार लोकांच्या मनात येत नाही. मुलगाच हवा म्हणून अडून बसून अनेक संसारांचा नुकसान होत आहे, हीच खरी शोकांतिका आहे.