चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून; सदर बझार येथील घटना

सदरबझारमधील कुपर कॉलनी परिसरात राहणाऱ्या शिला दादासो फाळके (वय २४) या विवाहितेस मारहाण करत तिचा गळा आवळून खून केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात पतीसह चौघांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

  सातारा : सदर बझारमधील कुपर कॉलनी परिसरात राहणाऱ्या शिला दादासो फाळके (वय २४) या विवाहितेस मारहाण करत तिचा गळा आवळून खून (Murder in Satara) केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात पतीसह चौघांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. दादासो गणपत फाळके, अरुणा गणपत फाळके, गणपत मारुती फाळके, सागर गणपत फाळके (सर्व रा. प्‍लॉट नंबर २१, कुपर कॉलनी, सदरबझार) अशी संशयितांची नावे आहेत.

  सदर बझारमधील लिलाताई हौसिंग सोसायटी परिसरात मोनिका जर्नादन साठे या राहण्‍यास आहेत. त्‍यांची बहिण शिला यांचे कुपर कॉलनीत राहणाऱ्या दादासो फाळके याच्‍यासोबत लग्‍न झाले होते. त्‍यांना चार वर्षाची मुलगी असून, लग्‍न झाल्‍यानंतर काही दिवसांतच दादासो हा चारित्र्याच्‍या संशयावरून शिला यांना दारुच्‍या नशेत मारहाण करत असे. माहेरी गेल्‍यास जीवे मारीन, अशी धमकी देत असे.

  याबाबतची माहिती शिला या अधूनमधून माहेरी असणाऱ्या बहिणीस तसेच इतरांना देत असत. गुरुवारी (दि.१६) दुपारी तीन वाजता शिला ही पती, मुलीसमवेत माहेरी आली. दादासो हा आपण बागेत फिरायला जावू असे म्‍हणाला. त्‍याला मोनिका यांनी नकार दिला. यानंतर दादासो हा पती, मुलगी तसेच मोनिका यांच्‍या घरातील लहान मुलांना घेऊन बागेत गेला. सायंकाळी सातच्‍या सुमारास ते सर्वजण मोनिका यांच्‍या घरी आले. यानंतर दादासो पुन्‍हा इतरांना बाहेर घेऊन गेला. बाहेर गेलेल्‍या मोनिका सायंकाळी सातच्‍या सुमारास घरी आल्‍या. यावेळी त्‍यांना दादासो दारुच्‍या नशेत आई-वडिलांना शिवीगाळ करत असल्‍याचे आढळले.

  यानंतर मोनिका यांच्‍या आईने दादासो याच्‍या आईस फोन करुन बोलावून घेतले. त्‍या आल्‍यानंतर त्‍यांनी दादासो, शिला व चार वर्षांच्‍या मुलीस घरी नेले. त्‍यानंतर रात्री साडेबाराच्‍या सुमारास शिलाच्‍या सासूचा मोनिका यांच्‍या वडिलांना फोन आला. त्‍यांनी फोनवर शिला आजारी असून, तिला सिव्‍हिल हॉस्‍पिटल येथे आणल्‍याचे सांगितले. यानुसार मोनिका यांचे वडील त्‍याठिकाणी गेले. याठिकाणी शिलाचे सासू,सासरा, पती, दीर व इतर नातेवाईक होते. यानंतर रात्री एकच्‍या सुमारास फोन करुन वडिलांना मोनिका यांना शिला मृत झाल्‍याची माहिती दिली. घरात लहान मुले असल्‍याने मोनिका या रात्री सिव्‍हिल हॉस्‍पिटल येथे गेल्‍या नाहीत.

  शुक्रवारी (ता.१७) मोनिका या सकाळी ११ च्‍या सुमारास सिव्‍हिल हॉस्‍पिटल येथे गेल्‍या. यावेळी त्‍यांनी बहिण शिला मृतदेह पाहिला. यावेळी त्‍यांना शिला यांच्‍या गळ्यावर, गालावर, हात, कोपऱ्यावर जखमा असल्‍याचे, हातातील बांगड्या फुटल्‍याचे दिसले. दादासो व त्‍याच्‍या कुटुंबियांनी शिला यांना मारहाण करत गळा दाबून केल्‍याचा संशय यावेळी मोनिका यांनी व्‍यक्‍त केला.

  यानुसार मोनिका साठे यांनी याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली. यानुसार दादासो फाळके, अरुण फाळके, गणपत फाळके, सागर फाळके यांच्‍यावर खूनाचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. पोलिसांनी त्‍यांना अटक केली असून, याचा तपास सहाय्‍यक निरीक्षक माने हे करीत आहेत.