गळा आवळून ठार केलं जिवंत असेल म्हणून पुन्हा…; चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून सुनिल तानाजी गुरव याने पत्नी प्रियांका हिचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी सुनिल तानाजी गुरव (वय ३१) याला त्याच्या तुजारपूर गावातून ताब्यात घेतले. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  इस्लामपूर : चारित्र्याच्या संशयावरून सुनिल तानाजी गुरव याने पत्नी प्रियांका हिचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी सुनिल तानाजी गुरव (वय ३१) याला त्याच्या तुजारपूर गावातून ताब्यात घेतले. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  वाघवाडी येथे बांदल मळ्यात प्रियांका सुनिल गुरव (वय २८ रा. तुजारपूर) या विवाहितेचा मंगळवारी रात्री अज्ञाताने गळा आवळून खून केला होता. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यातील तिचा पती सुनिल याने खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

  प्रियांका व सुनिल गुरव या पती-पत्नीमध्ये एकमेकांच्या चारित्र्याच्या संशयावरून गेल्या सहा महिन्यांपासून वाद होत होता. हा प्रकार गावपातळीवर पोलीस पाटील व अन्य जबाबदार व्यक्तीच्या मध्यस्थीने मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. तरीही सतत पती-पत्नीमध्ये खटके उडत होते.

  सात-आठ वर्षांपूर्वी तुजारपूर येथील सुनील गुरव या होमगार्ड तरुणाशी तिचा विवाह झाला होता. त्यांना तीन व पाच वर्षांच्या दोन मुली आहेत. गेल्या काही दिवसांत प्रियांकाचा तिच्या पतीशी सतत वाद-विवाद होत होता. त्यामुळे ती अनेकदा वाद करून घराबाहेर पडत होती. पुन्हा नातेवाईकांच्या समजुतीनंतर ती सासरी तुजारपूर येत होती. मागील आठवड्यात तिने पतीच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली होती. सततच्या वादाला घरातील व नातेवाईक कंटाळले होते.

  पंधरा दिवसांपूर्वी प्रियांका ही वाद करून घराबाहेर पडली होती. नेहमीच ती अशी वागत असल्याने घरातील कोणीही शोध घेतला नाही. असे असले तरी ती मोबाईल नसताना कोणाच्यातरी मोबाईलवरून पतीला संपर्क साधून होती.

  मंगळवारी सायंकाळी प्रियांकाचा पती सुनीलशी संपर्क झाला. त्याने झाले गेले यावर पांघरूण टाकू. आपण निवांत ठिकाणी जाऊन बोलू असे गोड बोलत दुचाकीवरून तिला वाघवाडी ते शिवपुरी रस्त्यावर नेले. तेव्हा रात्रीचे नऊ-साडे नऊ वाजले होते. मुख्य रस्त्यावरून तीनशे फुटावर बांदल मळ्यात लिंबाच्या झाडाखाली दोघे बोलत बसले होते. बोलता बोलता वादाचे विषय झाले. तेव्हा प्रियांका हिचे लक्ष विचलित करून पती सुनिल याने तिचा गळा आवळून ठार मारले. अजून जिवंत असेल म्हणून पालथी टाकून तिची ओढणीने मान मोडली. डोके मातीत आदळले. बाहेरख्याली असणाऱ्या प्रियांकाला संपवून तो गावकडे गेला. बुधवारी दिवसभर तो गावात होता.

  दरम्यान, बुधवारी दुपारी बांदल मळ्यात रिकाम्या शेतात एक महिला विवस्त्र अवस्थेत मृत आढळली. परिसरातील शेतकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना तपासासाठी सूचना केल्या होत्या.

  घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव, चेतन माने पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव यांनी तपास केला. पोलीस दिनकर महापुरे, पोलीस हवलदार अमर जंगम, प्रदीप पाटील,शरद जाधव, प्रशांत देसाई, योगेश जाधव यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रवीण साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ठोंबरे, पोलीस नाईक अरुण पाटील, सचिन सुतार, आलमगीर लतीफ यांनी संशयीत सुनील गुरव याला अटक केली.

  अशी पटली मृत महिलेची ओळख..!

  मृत महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर होते. मृतदेहाच्या बाजूला कपडे व मेकअपचे साहित्य असणारी पिशवी पोलिसांना मिळून आली. त्यात इस्लामपूर पोलीस ठाण्याचा फोन नंबर लिहलेली चिठ्ठी मिळाली. त्यातील अक्षर एका पोलीस कर्मचाऱ्यांचे असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा त्या पोलिसाने ही महिला पोलीस ठाण्यात आली होती. ती तुजारपूर गावातील आहे. पती-पत्नीच्या वादविवादाची तक्रार घेवून आली होती, अशी माहिती लागली. तेव्हा ती होमगार्ड असणाऱ्या सुनील गुरव याची बायको असल्याचे स्पष्ट झाले.

  संशयाचा फास आणि संसाराचा नाश…!

  प्रियांका व सुनिल या पती-पत्नीमध्ये एकमेकांच्या चारित्र्याच्या संशयावरून वाद होत होता. या रागातून सुनीलने क्रूरपणे पत्नीचा गळा आवळला. पत्नीला यमसदनी धाडून तो आता गजाआड झाला. यामुळे अवघ्या तीन व पाच वर्षांच्या दोन मुलींवर अनाथ होण्याची वेळ आली आहे.