भुदरगड तालुक्यात तरसाचा अक्षरश: धुमाकूळ; तीन बकऱ्यांसह बारा कुत्र्यांचा फडशा

भुदरगड तालुक्यातील पंडिवरे-भुजाबाई पठारावर तरसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, ३ बकर्‍यांसह दहा ते बारा कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. तरसाच्या वावराने शेतकरी चांगलेच धस्तावले आहेत.

    भुदरगड / नवराष्ट्र नेटवर्क न्यूज : भुदरगड तालुक्यातील पंडिवरे-भुजाबाई पठारावर तरसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, ३ बकर्‍यांसह दहा ते बारा कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. तरसाच्या (Hyena Attacked) वावराने शेतकरी चांगलेच धस्तावले आहेत.

    गेल्या दोन महिन्यांपूर्वी मडिलगे-कलनाकवाडी खिंडीत तरसाने आपले ठाण मांडले होते. रात्रीच्या वेळी तरसाने दर्शन दिले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. कलनाकवाडी, आंबवणे मडिलगे परिसरातील जंगलात तरसाचा वावर वाढला होता. त्यानंतर तरसाने आपला मोर्चा पंडिवरे-भुजाबाई परिसरातील जंगलात वळविला असून, या ठिकाणी मुक्काम ठोकला आहे.

    पंडिवरे येथील बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या तीन बकऱ्या तरसाने पळवल्या आहेत. याशिवाय चार कुत्रीही पळवली आहेत. तसेच भुजाबाई पठारावरील आठ कुत्र्यांचाही जीव घेतला आहे. गुरे चारावयास गेलेल्या गुराख्यांना बकरी व इतर प्राण्यांचे सांगाडे आढळून येत आहेत.

    रात्रीच्यावेळी पंडिवरे जंगलाशेजारी तरसाचे दर्शन झाल्याचे बाजीराव पाटील यांनी सांगितले. तरसाने घातलेल्या धुमाकुळामुळे कुत्र्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. बकरी पाळणारे शेतकरी मात्र चांगलेच धस्तावले असून, जंगलात बकरी चरण्यास नेण्याचे बंद केले आहे.