अजय बारसकरला उत्तरे द्यायला मी बंधनकारक नाही, मनोज जरांगे पाटील यांचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून प्रसिद्धीसाठी असे वागत असल्याचा आरोप बारसकर यांनी केला आहे.

    जालना : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून प्रसिद्धीसाठी असे वागत असल्याचा आरोप बारसकर यांनी केला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांना प्रतिक्रिया दिली आहे. अजय बारसकरला उत्तरे द्यायला मी बंधनकारक नाही असे प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे.

    मनोज जरांगे पाटील यांनी अजय बारसकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, अजय बारसकर सारख्या भंगार लोकांवर बोलायचे नाही आहे. भंगार लोकांवर बोलायला मी तयार नाही. माय माऊल्या येणार आहेत तेव्हा त्याला कळेल. मी आरोप करणाऱ्याला काही बोलणार नाही. बारसकरांचे आता सगळे बाहेर पडणार आहे. तुझा हिशेब व्यवस्थित होणार आहे. इथे फक्त मराठा कोर कमिटी आहे. मला माझा समाज महत्त्वाचा आहे. मी त्याला माझ्या कामातून उत्तर देणार आहे. असे प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे.

     काय म्हणाले अजय महाराज बारसकर ?

    मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मीदेखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे. मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो. मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकुल नाही. मी कीर्तनाचे वगैरे पैसे घेत नाही. आताच हे का झालं तर काही दिवसापासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली.