‘मला कुठल्याही पदाची हौस नाही, नवीन काही पाहिजे असंही नाही’; दमानियांच्या ‘त्या’ दाव्यावरून छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

'मला कुठल्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसीसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही. असे काही प्रपोजल मला आले नाहीत. माझ्या पक्षात मी मंत्री आहे, माझी काही घुसमट होत नाही.

    नाशिक : ‘मला कुठल्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसीसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही. असे काही प्रपोजल मला आले नाहीत. माझ्या पक्षात मी मंत्री आहे, माझी काही घुसमट होत नाही. मला अजून काही माहिती नाही, त्यांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही, अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

    नाशिक येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, संजय गायकवाड यांनी माझ्याबद्दल जे काही बोललं ते मी ऐकलं, मला पण ते एकूण वाईट वाटलं. जी भाषा त्यांनी काल वापरली ती बरोबर नाही. मी पण शिवसेनेत होतो, तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सीनियर प्रोफेसर होतो. त्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री बघतील. मला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. लाथ घालण्याची भाषा त्यांनी केली. मात्र, ते काही होऊ शकत नाही. कारण, मी आनंद दिघे आणि इतर मोठ्या शिवसेनेच्या नेत्यांचा नेता म्हणून मी काम केले आहे.

    तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल मी आभारी आहे, त्यांनी माझ्याबद्दल प्रेम दाखवलं. जरांगे मोठे नेते आहेत. ते काहीही करू शकतात. काल त्यांनी बजेटमधून आरक्षण देण्याची मागणी केली, हे मला कधी सुचले नाही. शिवाय, ओबीसीबद्दल सगळेच काम करू शकतात. उद्या आमची मोठी रॅली होईल, पुढची दिशा आम्ही जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.