हकालपट्टीच्या ‘त्या’ पत्रावर आढळराव पाटील म्हणतात, ‘एक-दोन दिवस विचार करेन अन्…’

शिवसेनेचे उपनेते तथा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त आज सकाळी विविध वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले आणि काही वेळातच मातोश्रीवरून आढळराव पाटील शिवसेनेतच असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

  पुणे : शिवसेनेचे उपनेते तथा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव  (Shivajirao Adhalarao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त आज सकाळी विविध वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले आणि काही वेळातच मातोश्रीवरून आढळराव पाटील शिवसेनेतच असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत आढळराव पाटील यांनी ‘मी अस्वस्थ आहे. काय बोलावं ते कळत नाही. एक-दोन दिवस विचार करेन आणि पुढचं काय ते ठरवेन’, असे सूचक विधान केले.

  आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीच्या वृत्ताने पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, सेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम देखील निर्माण झाला आहे. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या आपल्या निवासस्थानी दुपारी पत्रकार परिषद घेऊन ‘शिवसेनेतील माझे स्थान काय आहे’ असा टोला पक्षश्रेष्ठींना लगावून मनातील खदखद बोलून दाखवली.

  बातमी वाचून सुरुवातील मस्करी वाटली

  आज सकाळपासून मला अनेकांचे फोन आले. सामनामध्ये तुमच्या हकालपट्टीची बातमी वाचल्याचं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला मला ती मस्करी वाटली. आधी मला विश्वासच वाटेना. त्यानंतर मी सामना वाचला आणि मला धक्का बसला. काल रात्रीच माझं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं होतं. मतदारसंघातील ५० कार्यकर्ते तुम्हाला उद्या भेटायला येतील, असं मी त्यांना फोनवर सांगितलं होतं, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

  उद्धव ठाकरेंची अभिनंदनाच्या पोस्टवरून नाराजी

  मी पक्षाविरोधात कोणती कारवाई केली ते कळायला मार्ग नाही. उद्धव ठाकरेंनी काल फोनवर बोलताना मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणाऱ्या माझ्या पोस्टचा उल्लेख केला. त्या पोस्टबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यात काहीच गैर नसल्याचं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं. त्यावर जे झालं ते झालं, असं ठाकरे म्हणाले.

  राष्ट्रवादीविरुद्ध लढतो त्याचीच शिक्षा मिळाली असावी…

  राष्ट्रवादीविरुद्ध लढतो त्याचीच शिक्षा बहुधा मला मिळाली असावी. मी अस्वस्थ आहे. काय बोलावं ते कळत नाही. एक दोन दिवस विचार करेन आणि पुढचं काय ते ठरवेन, असे आढळराव पाटील यांनी म्हटले.