मी यापुढे निवडणूक लढणार नाही’, एकनाथ खडसेंची मोठी घोषणा

आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही,असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

    मुंबई : शरद पवार गटातून बाहेर पडलेले आणि भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे ते निवडणूक लढवणार नाहीत अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्य़ा मुलाखतीमध्ये एकनाथ खडसे यांनी घोषणा केली आहे. मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते. मात्र, आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही,असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

    मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही

    निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे सांगत एकनाथ खडसे म्हणाले, ‘मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मी अजून ही पाच वर्ष विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले आहे की, आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मला शरद पवार यांनी अभय दिल्यानंतर इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी देणंघेणं नाही. मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझे निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही, काही गोष्टी माझ्यासाठी राखीव राहू द्या,’ असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

    त्याबाबतीत मी निश्चिंत आहे

    पुढे त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत देखील प्रतिक्रिया दिली. खडसे म्हणाले, “भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की, नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होईल. म्हणून मी त्याबाबतीत निश्चिंत आहे. मी भाजपमध्ये येणार या मुद्द्यावर काही लोकांची नाराजी होतीच. एवढे वर्ष सोबत काम केले होते. म्हणून सर्व गुणगान करतील असे होत नाही. काही लोक दुखावले जातात, त्यांच्या नाराजीचा परिणाम अशा गोष्टींवर (पक्ष प्रवेश) होत असतो. जे नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मी करत आहे,” अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.