फडणवीसांशी चर्चा केल्यावरच नाराजीबाबत बोलेन – आमदार माजी मंत्री राम शिंदे

नगरमधून उमेदवारीसाठी मीही इच्छुक होतो. याआधीही दोन निवडणुकांच्या काळात मी इच्छुक होतो. मात्र आता डॉ. विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

    अहमदनगर : महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांची अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली असली, तरी मागील पाच वर्षात घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यांवर होती हे स्पष्ट करेल. असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले. पुढे ते म्हणाले, तिकीट एकदा जाहीर झाल्यावर पाचवेळा जाहीर माफी मागण्याची वेळ यायला नको होती. नगरमधून उमेदवारीसाठी मीही इच्छुक होतो. याआधीही दोन निवडणुकांच्या काळात मी इच्छुक होतो. मात्र आता डॉ. विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

    कोणत्या निकषावर मला उमेदवारी मिळाली नाही, हे मला सांगता येणार नाही. मात्र डॉ. विखेंना उमेदवारी मिळाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीही जाहीरपणे दिली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही माझ्याशी चर्चा केली. त्या चर्चेत मी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतल्याचे समजले. मात्र फडणवीस यांच्याकडून मला काहीही निरोप नाही, पण नाराजी संदर्भात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर फडणवीस यांच्या स्तरावरच चर्चा होईल. त्यानंतर ते मुद्दे काय होते ते मी स्पष्ट करेल. मागील चार-पाच वर्षात झालेल्या विविध घटना व मुद्द्यांचे निरसन होणे आवश्यक आहे.