
पदोन्नती मिळाल्यामुळे हे अधिकारी खुश झाले होते. मात्र, दोन महिने उलटूनही त्यांना अद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. नियुक्ती मिळण्यासाठी हे अधिकारी मंत्रालयात वारंवार फेऱ्या मारत आहेत.
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्यातील ५५ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची (Ias Officers) राज्य सरकारने बदली (Transfer) केली. मात्र, दोन महिने उलटून गेल्यानंतरही त्यांना नियुक्ती पत्र (Appointment Letter) देण्यात आलेले नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना पदोन्नती (Pramotion) तर मिळाली पण नियुक्ती नसल्यामुळे घरी बसण्याची वेळ आली आहे. शिवाय घरी बसून हे अधिकारी पगार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे सरकारने (Shinde Goverrnment) साधारण दोन महिन्यांपूर्वी उप जिल्हाधिकारीपदावरील ४५ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली. तसेच, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडे अनेक अधिकारी खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी या पदावर काम करत होते. त्यातील १० अधिकाऱ्यांनाही बढती देण्यात आली.
पदोन्नती मिळाल्यामुळे हे अधिकारी खुश झाले होते. मात्र, दोन महिने उलटूनही त्यांना अद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. नियुक्ती मिळण्यासाठी हे अधिकारी मंत्रालयात वारंवार फेऱ्या मारत आहेत. आम्हाला काम करायचे असून लवकर नियुक्ती मिळावी अशी मागणी हे अधिकारी करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नेमके कारण काय?
चांगली मलईदार जागेवर बदली किंवा नियुक्ती होण्यासाठी सगळेच अधिकारी धडपडत असतात. मात्र, ज्याची जास्त बोली त्याला अपेक्षित ठिकाणी लवकर नियुक्ती दिली जाते किंवा बदली केली जाते. मंत्रालयात बदल्या आणि नियुक्त्या यामागे मोठे अर्थकारण असून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडण्यामागे हे मोठे कारण आहे.
रोजगार हमीवर काम करणाऱ्या व्यक्तीला त्यादिवशी कामावर हजर नसेल तर मोबदला मिळत नाही. मात्र, या अधिकाऱ्यांना काम केले नाही तरी पगार सुरूच आहे. हा पगार थोडाथोडका नाही तर दीड ते दोन लाख दरमहा इतका आहे. दोन महिने हे ५५ अधिकारी घरी बसून पगार घेत आहेत. परंतु, त्यांना नियुक्ती देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही अशी अवस्था आहे.