बेटरहाफ साईटवर ओळख; लग्नाचे आमिषाने बलात्कार; तरुणीच्या नावे कर्ज काढून २६ लाखांची फसवणूक

  पुणे : बेटरहाफ या वेबसाईटवरून तरुणीशी ओळख निर्माण केली. तिला स्वत:चे खोटे नाव सांगत लग्नाचे आमिष दाखविले व वारंवार वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात तोटा झाल्याचे सांगत तिच्या नावावर कर्ज काढून त्याद्वारे २६ लाख ६० हजार रुपये घेत फसवणूक केली आहे.

  कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार

  याप्रकरणी ३० वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अमित चव्हाण (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  वेबसाईटवर प्रोफाईल तयार

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी विवाहासाठी बेटरहाफ या वेबसाईटवर प्रोफाईल तयार केले होते. त्यावर स्वत:चे नाव लपवले. या तरुणीशी त्यामाध्यमातून ओळख निर्माण केली. त्यानंतर तरुणीला स्वत:चे नाव रोहित राजाराम देशमुख असे असल्याचे अमित चव्हाण याने सांगितले. तक्रारदार तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारिरीक संबंध ठेवले. त्याचे व्हिडिओ काढले. इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय असून त्यात तोटा झाल्याचे सांगत त्यांना कर्ज काढायला लावले. कर्ज काढलेले २६ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यांनी कर्जाचा हप्ता भरायला सांगितल्यावर त्याने नकार देऊन अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

   

  चौकशी केली तेव्हा त्याने आपले खरे नाव लपवून ठेवले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तरूणीने तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.