केला कुटाणा, घातला धिंगाणा, होणार राडा?; उद्धव ठाकरेंनीही ठोकलाय शड्डू,आता करणार आहेत असं काम की…

दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घ्यायचा असा चंगच उद्धव ठाकरेंनी बांधला आहे त्यामुळेच शिवसैनिकांनी दसऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर जमण्याचा आदेशही गेला आहे.

  मुंबई : दसरा मेळाव्याला (Dasara Melava) अजूनही परवानगी मिळाली नसल्याने उद्धव ठाकरे यांनी प्लान बी तयार ठेवला आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच (Shivtirtha) होणार आणि त्यासाठी शिवसेनेने प्लान तयारही केला आहे.

  उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आवाज शिवतीर्थवरच घुमणार अशीच शक्यता निर्माण झालेली आहे. शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी मिळालीय तर दुसरीकडे शिवतीर्थाचा निकाल येणं अद्याप बाकी आहे पण दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच घ्यायचा हा चंगच उद्धव ठाकरेंनी बांधलाय त्यामुळेच शिवसैनिकांनी दसऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर जमण्याचा आदेशही दिला आहे. बिनापरवानगी सभा घ्यायचा बाका प्रसंग गुदरलाच तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणही होऊ शकतो आणि यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे असा राडा होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

  असा आहे शिवसेनेचा प्लान बी?

  • शिवसेनेने शिवतीर्थ आणि बीकेसीच्या जागेची मागणी केली आहे
  • शिवसेना कोणाची हा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे पालिका हे मैदान राखीव ठेऊ शकते
  • असं जरी झालं तरी शिवसैनिकांना शिवाजी पार्कवर जमण्याचे आदेश दिले गेले आहेत
  • शिवाजी पार्कवरच्या स्मृती स्थळ किंवा शिवसेना भवनाच्या चौकात सर्व जमा होतील
  • बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्या दसरा मेळाव्यात टॅक्सीवर उभं राहून भाषण केलं होतं तसं उद्धव ठाकरे चौकात उभे राहून भाषण करतील
  • हा शेवटचा पर्याय उद्धव आणि त्यांच्या सेनेने ठेवला आहे
  • महापालिकेच्या निकालानंतर ते कोर्टाच्या माध्यमातून परवानगी घेण्याचा प्रयत्न करतील जर परवानगी नाही मिळाली तर गर्दी जमवून थेट गर्दीतूनच भाषण करणार

  दसरा मेळाव्यावरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय. या मेळाव्याआधीच नेत्यांमध्ये हमरी तुमरीची भाषा ऐकायला मिळत आहे. राज्यात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मुंबईत वेगळं चित्र दिसू शकतं त्यात पालिकेला परवनागी द्यावी लागेल किंवा पालिका आम्हालाच परवानगी देईल असा अजूनही विश्वास उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना वाटतो आहे.

  पुढच्या काही तासात महापालिका शिवतीर्थाावर आवाज कुणाचा यावर निकाल देणार आहे. निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेला आणि शिंदे गटाला परवानगी मिळाली तर दोन्ही गटाचे नेते आमनेसामने येऊ शकतात किंवा दोन्ही गटाला परवानगी नाकारली तरी उद्धव ठाकरे विरुद्ध पोलीस असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे निकाल येईपर्यंत दोन्ही गटांसोबत पोलिसांचीही धाकधूक वाढली आहे.