खोके घेतल्याचे सिद्ध झाल्यास मातोश्रीवर भांडी घासेन; रामदास कदम यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

आम्ही पन्नास खोके घेतले हे सिद्ध केल्यास मी मातोश्रीवर जाऊन भांडी घासेन. जर त्यांनी सिद्ध केलं नाही तर त्यांनी माझ्या घरात भांडी घासावीत, असे आव्हान माजी मंत्री रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंना दिलं आहे.

  कोल्हापूर : पन्नास खोके घेतल्याचा आरोप ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदारांवर करण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांनी आम्ही पन्नास खोके घेतले हे सिद्ध केल्यास मी मातोश्रीवर जाऊन भांडी घासेन. जर त्यांनी सिद्ध केलं नाही तर त्यांनी माझ्या घरात भांडी घासावीत, असे आव्हान माजी मंत्री रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंना दिलं आहे.

  उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, सगळे आपल्याला सोडून का गेले ? माझे आणि दिवाकर रावते यांचे पद काढले आणि पुत्राला दिले. असे बाळासाहेबांनी कधी केले नाही. त्यांच्यासोबत जे नेते होते. त्यांना संपवण्याचं कामं उद्धव ठाकरे यांनी केले आहे, म्हणून एकनाथ शिंदे यांचा पर्याय स्वीकाराला असल्याचे कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ५५ वर्षे होतो, पण आता उद्धव ठाकरे आणि त्यांचं पिल्लू आदित्य ठाकरे काय वाटेल ते बरळत सुटलेत. त्यांचे टोमणे मारण्याचे काम सुरू आहेत. दिवा विजण्याच्या आधी फडफडतो, अशीच त्यांची परिस्थिती झाली आहे. सकाळी उठल्यापासून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचे काम त्यांचे सुरू आहे. अशी टीका कदम यांनी ठाकरेंवर केली.

  लोकसभा आणि विधानसभा आम्ही जिंकूच, आम्ही आणखी मेहनत घेऊ. जिथं ठाकरे यांची सभा होईल. तिथे दुसऱ्या दिवशी माझी सभा होईल, असे आव्हान कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आम्ही साकार करू, असे कदम यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार बाहेर येईल, असेही कदम यांनी म्हटले आहे.

  मिठाई आणि पुष्कळ खोके त्यांना दिले

  मातोश्रीवर खोक्यांचा पाऊस पाडवा लागतो तरच मंत्रिपद मिळते, असा आरोप कदम यांनी ठाकरेंवर केला तर आम्ही मिठाई आणि पुष्कळ खोके त्यांना दिले असल्याचे कदम यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार आमच्यासोबत येतील, असा विश्वास आम्हाला आहे. आता मला आमदारकी आणि खासदारकी नको, मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी खूप काही दिल आहे, मी त्यात समाधानी असल्याचे कदम यांनी म्हटले.

  ज्यांचे पोट रिकामे आहे, त्याला आरक्षण द्या

  राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा धुमसत आहे. मराठा समाज आक्रमक झाला आहे, तर मनोज जरांगे पुन्हा एकदा गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृतीही बिघडली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर बोलताना रामदास कदम म्हणाले, ज्यांचे पोट रिकामे आहे, त्याला आरक्षण द्या हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते करत आहेत. मराठ्यांना कायमचे आणि कायद्यात टिकेल, असे आरक्षण मुख्यमंत्री देतील, असेही कदम यांनी सांगितले.