sitaram kunte and debashish chakraborty

केंद्राकडे पाठवण्यात आलेल्या सीताराम कुंटे यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारने मंजूर केला नसल्याने कुंटे यांना आज (दि ३०) मध्यरात्री नंतर निवृत्त(Retirement Of Sitaram Kunte) व्हावे लागणार आहे ,अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या जाणकार सूत्रांनी दिली आहे.

    मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे(Chief Secretary Sitaram Kunte) यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत असताना त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ(Date Extension For Sitaram Kunte)  देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर मंजूरीची अंतिम क्षणापर्यंत प्रतिक्षा होती. मात्र केंद्राकडे पाठवण्यात आलेल्या सीताराम कुंटे यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीचा प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी न दिल्याने अखेर कुंटे यांनी निवृत्ती स्विकारत अतिरिक्त कार्यभार देबाशिष चक्रवर्ती (Debaashish Chakraborty)यांच्याकडे सोपविला आहे.

    वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरु
    केंद्र सरकारला पाठविण्यात आलेल्या कुंटे यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरु होते. मात्र ३० तारखेच्या कार्यालयीन वेळ संपेपर्यत सीताराम कुंटे यांच्या ३ महिन्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यामुळे नव्या मुख्य सचिवांची नियुक्ती करावी लागणार आहे. दरम्यान कुंटे यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सेवा ज्येष्ठतेनुसार अतिरिक्त प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी स्विकारला आहे.

    शिफारशीला मंजूरी देण्यात अडचणी
    मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर सीताराम कुंटे यांचे रश्मी शुक्ला प्रकरणात माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि अन्य अधिकाऱ्यांशी असलेले संबंध दुरावल्याचे सांगण्यात येत आहे ठाकरे सरकारसोबत त्यांचे चांगले संबंध असलेतरी केंद्रातील भाजपशी जवळचे संबंध असलेल्या अधिकाऱ्यांशी त्यांचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. त्यातच सध्या बदली घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात सीबीआय सोबत संबंध ताणले गेल्याने तीन महिन्यांची मुदतवाढीच्या राज्य सरकारच्या शिफारशीला मंजूरी देण्यात अडचणी होत्या अशी माहिती या सूत्रानी दिली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारला असून देवाशिष चक्रवर्ती यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

    कुंटे यांना मुदतवाढ देण्याबाबत नकारात्मक सूर
    दरम्यान राज्यात आगामी काळात मुंबईसह इतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता सीताराम कुंटे यांच्याकडेच मुख्य सचिवपदाची धुरा राहिल्यास राजकीयदृष्ट्या ते भाजपला अडचणीचे ठरण्याची शक्यता असल्याने केंद्रातील भाजप सरकार कडून कुंटे यांना मुदतवाढ देण्याबाबत नकारात्मक सूर असल्याचे सांगण्यात येत आहे असे या सूत्रांचे मत आहे. कुंटे यांच्या निवृत्ती नंतर राज्याचे नवे मुख्यसचिव पदी कुणाची वर्णी लागणार याबाबत सनदी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.