‘मुंबईत मराठी उमेदवार मिळत नसेल तर…’ शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची फडणवीसांना पत्राद्वारे ‘ही’ मागणी

महाराष्ट्रामध्ये मराठी उमेदवार मिळत नाही म्हणून, मुंबई मध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी केले आहे.

    मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर देखील महायुतीकडून मुंबईतील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. यावरुन आता महाविकास आघाडीने भाजपवर निशाणा साधला आहे. अलीकडेच सुरतमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठी उमेदवार मिळत नाही म्हणून, मुंबई मध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी केले आहे.

    शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये निलेश भोसले म्हणाले आहेत की, ”6 लोकसभा मतदार संघ असलेल्या मुंबई मध्ये भारतीय जनता पार्टी मार्फत उत्तर मुंबई व ईशान्य मुंबई या 2 लोकसभा मतदारसंघात तुमच्या पक्षाने 2 अ – मराठी म्हणजेच गुजराती उमेदवार दिले आहेत. हा निर्णय तुमच्या पक्षाचा असल्याने त्यावर आम्ही भाष्य करणे उचित ठरणार नाही.”

    पुढे त्यांनी लिहिले आहे की, “मुंबई मध्ये लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊन देखील तुमच्या पक्षाला ‘मराठी उमेदवार’ मिळत नसल्याचे कळते. अशा परस्थिमध्ये कोणी तरी सोम्या गोम्या उमेदवार देण्या पेक्षा, सुरत लोकसभाप्रमाणे मुंबई मधील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आपणास विनंती करत आहे. मुंबईमध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई ह्या ३- लोकसभा मतदार संघात निवडणुक बिनविरोध केल्यास शासनाच्या यंत्रणेवर येणारा खर्च व ताण मोठ्या प्रमाणात वाचेल ह्याची खात्री वाटते.देश हीतासाठी व करदात्यांच्या पैसा वाचवण्यासाठी, सदर प्रस्तावाचा आपण सकारात्मक विचार कराल, ही विनंती.” या आशयाचे पत्र निलेश भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.