उचल ‘न’ दिल्यास हंगाम सुरु करु देणार नाही; राजू शेट्टींचा साखर कारखान्यांना इशारा

चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एकरकमी एफआरपीसह अधिकचे ३५० रूपये प्रतिटन पहिली उचल म्हणून देण्यात यावी. तरचं यंदाच्या हंगामाला सहमती दिली जाईल. नाहीतर या हंगामात संघर्ष अटळ आहे. शिवाय मागचे एफआरपी अधिकचे २०० रुपये दिल्याशिवाय यंदाचा हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

    जयसिंगपूर : चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एकरकमी एफआरपीसह अधिकचे ३५० रूपये प्रतिटन पहिली उचल म्हणून देण्यात यावी. तरचं यंदाच्या हंगामाला सहमती दिली जाईल. नाहीतर या हंगामात संघर्ष अटळ आहे. शिवाय मागचे एफआरपी अधिकचे २०० रुपये दिल्याशिवाय यंदाचा हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते संघटनेच्या २१ व्या ऊस परिषदेत बोलत होते.

    यावेळी राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्पात एफआरपी देण्याची केलेली कायदयातील बेकायदेशीर दुरूस्ती शिदे-फडणवीस सरकारने तातडीने रद्द करावी. गतवर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी पूर्णपणे देऊन अधिक २०० रूपये तातडीने द्यावेत. साखर आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करावेत. उस तोडणी यंत्राने तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटाचे वजन ४.५ टक्के एवढी तोडणी घट करण्यात आलेली आहे. ती रद्द करून १.५ टक्के करण्यात यावी.

    यावेळी माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक म्हणाले, आम्ही दोन वेळा मोर्चा काढला. ह्या सरकारला बाकी विषयांसाठी वेळ आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी नाही. किमान प्रोत्साहन अनुदान तरी दिवाळी आधी द्यावे. गतवर्षीचा एफआरपी अधिक २०० अजूनही मिळाली नाही ते घेतल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

    स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील म्हणाले, जोवर आमदार-खासदारांचे पाय चाटणारी लोकं आहेत. तोवर ऊस परिषद घ्याव्याचं लागतील. ज्यावेळी सामान्य कार्यकर्ता आमदार होईल त्यावेळीचं संघटनेचे सार्थक होईल. ज्या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे त्यांनी ५० खोके घेऊन लिलाव केला आहे. दगलबाजीवर त्यांचा पाया उभा आहे. इडी, सिबीआयचा वापर करून ज्यांनी राज्य मिळवलं त्यांची इमारत लवकरच जमीनदोस्त होणार आहे. राज्यातील ४५ कारखाने कवडीमोल दरात विकले आहेत. उसापासून २७ उपपदार्थ तयार होतात परुंतु कारखानदार अजून २, ३ उपपदार्थातच आहेत, अशी टीका त्यांनी केली.

    यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप जगताप म्हणाले, राज्यात राजू शेट्टी हे एकमेव असे शेतकरी नेते आहेत जे शेतकरी प्रश्नावर कुठं हातोडा मारावा हे कळत. त्यामुळे त्यांना येत्या लोकसभेच्या निवडणुकीत संसदेत पाठवा. अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्य आण्णासो चौगुले होते. स्वागत शैलेश आडके यांनी तर प्रास्ताविक विठ्ठल मोरे यांनी केले.

    यावेळी शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे, स्वाभिमानी युवती आघाडीच्या पूजा मोरे, माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवाडकर, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, पोपट मोरे, महेश खराडे, सागर संभूशेटे, राजेंद्र गड्ड्यांनावर, शंकर नाळे,राम शिंदे,मिलिंद साखरपे, सागर मादनाईक यांच्यासह राज्यभरातून हजारो शेतकरी, महिला आघाडी, पदाधिकारी यांची उपस्थिती लक्षणीय होती.

     रविकांत तुपकर यांची गैरहजेरी !

    यावेळी स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता ते नाराज आहेत त्यामुळे आले नाहीत अशी चर्चा होती परंतु त्यांची तब्बेत बरी नसल्याने ते आज उपस्थित नाहीत असे स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्पष्ट केले.

    काटा मारणाऱ्यांचा काटा काढणार !

    यावेळी जयसिंगपूर परिसरात काटा मारणाऱ्यांचा काटा काढणार अशा फलकांची मोठी गर्दी केली होती. सर्व शेतकऱ्यांचे लक्ष त्या पालकांनी वेधून घेतले होते. त्याचबरोबर काही असूडाचा मोठा आवाज काढत होते.

    राजू शेट्टींची मराठवाड्याला भीती

    मराठवाड्यातील कारखानदारांनाही आता राजू शेट्टीची भीती आहे. त्यांच्या आदेशाने येथील कारखान्यावर आम्ही आंदोलन केले. त्यामुळे तात्काळ थकीत २ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. हे शेट्टींचे यश आहे. असे युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी सांगितले.