मनसेचा उमेदवार नसताना कोणासाठी शिवतीर्थावर सभा घेणार? अनिल परबांची राज ठाकरेंवर टीका

काही दिवसांआधी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलेल्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.

  काही दिवसांआधी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलेल्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.त्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये सभा घेणार आहेत. तर मुंबईच्या दादर शिवतीर्थावर नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे. १७ तारखेला शिवतीर्थावरील सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. शिवतीर्थावर ही सभा घेऊन राज ठाकरे कोणाची पोरं कडेवर खेळणार आहेत? कोणाच्या लग्नाच्या वरातीत राज ठाकरे आणि मनसे नाचणार आहे? असा सवाल शिवसेने ठाकरे गटाचे अनिल परब यांनी उपस्थित करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

  मनसेचा उमेदवार नसताना कोणासाठी सभा घेणार- अनिल परब

  राज ठाकरे यांनी काही दिवसांआधी सांगितलं होत की मी इतर कोणाची पोरं घेऊन कडेवर नाचणार नाही. मग आता उमेदवार त्यांचा नाही तर शिवतीर्थावर कोणासाठी सभा घेणार? आम्ही ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्याच दिवशी आम्ही शिवतीर्थावर सभा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज दाखल केला. हे सगळं काही रेकॉर्डवर आहे.आम्ही रस्त्यावर सभा घेत नाही तर आम्हाला आमची स्वतःची पोरं आहेत. २२ पोरांसाठी शिवतीर्थावर सभा घेणार आहोत. जर शिवतीर्थावर सभा घेता आली नाही तर आम्ही बीकेसी किंवा इतर कोणत्या जागेचा विचार करू असे अनिल परब यांनी सांगितले आहे.

  भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना मुंबईमधून उमेदवारी – अनिल परब

  लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराचे आरोप असून सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात आली. यावर बोलताना अनिल परब म्हणाले, ईडी चौकशीला सामोरे जाताना हा माणूस ढसाढसा रडला होता. भ्रष्टचाराचे आरोप असलेल्यांना आता मुंबईमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आता भाजपाला विनंती आहे की त्यांनी, रविंद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला किरीट सोमय्या यांना स्टार प्रचारक करावे, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

  हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या उमेदवारीवर बोलताना अनिल परब म्हणाले, हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी मिळाली असली तरी त्यांना कोणताही फायदा होणार नाही. सगळ्यांनी तिथे आपली जागा आहे असा आग्रह केला होता त्याचा फटका मात्र हेमंत गोडसे यांना बसला आहे. तसेच प्रत्येकाला आपला उमेदवार नाशिकमध्ये द्याचा आहे.