असे केले तर महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लक राहणार नाही; छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य चर्चेत

    Chhagan Bhujbals Big Statement : आता कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही. सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसींमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही उपायांची गरज आहे, असे मला वाटत नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

    काय म्हणाले आहेत छगन भुजबळ

    सगळेच्या सगळे मराठा जर कुणबी होणार आहेत तर मग क्युरेटिव्ह पिटिशन करा किंवा बिल आणा पण बाहेर कोण राहणार आहे? आयोगाचे लोकही राजीनामा देत आहेत. हा ओबीसींचा आयोग राहिलाच नाही हा मराठ्यांचा आयोग झाला आहे असंही छगन भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे पाटील माझ्याविरोधात रोज बोलतो कारण त्याशिवाय त्याचं भाषण कुणी ऐकणार नाही. हरिभाऊ राठोड गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला.

    दादागिरीने खोटी प्रमाणपत्रं दिली जात आहेत

    सध्याच्या घडीला दादागिरीने कुणबी प्रमाणपत्रं दिली जात आहेत. खोटी प्रमाणपत्रं दिली जात आहेत. तसंच पुढेही होणार आहे. यापुढेही जातपडताळणीच्या वेळी हेच होणार आहे. दादागिरी करणार आणि अशीच प्रमाणपत्रं घेतली जाणार आहेत. ओबीसींवर चर्चा घेऊन काय करायचं? आता सगळे मराठा ओबीसी होणार आहेत. त्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरु आहेत. न्यायमूर्ती शिंदे गावांमध्ये फिरून हे करा ते करा सांगत आहेत. सगळेच ओबीसी होणार आहेत. महाराष्ट्रात मराठा शिल्लकच राहणार नाहीत महाराष्ट्रात सगळे कुणबी होणार. मनोज जरांगेला कुणीतरी उंचीवर घेऊन जातं आहे. त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत हेच कारण आहे त्यामागे असंही छगन भुजबळ म्हणाले.