तुमच्यावर प्रेम असेल तर लोक तुमचेही पेंटिंग काढतील; नाव न घेता उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजे यांना टोला

माझ्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत. त्यातील काही महानव्यक्तींनी पेटींगबाबत इच्छा व्यक्त केली. बघू त्यांच्या इच्छेचे. लोक तुमच्यावर पण प्रेम करतील तेव्हा तुमचेही पेंटींग लावतील, अशा खोचक शब्दात टीका आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता खासदार उदयनराजेंनी केली.

सातारा : माझ्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत. त्यातील काही महानव्यक्तींनी पेटींगबाबत इच्छा व्यक्त केली. बघू त्यांच्या इच्छेचे. लोक तुमच्यावर पण प्रेम करतील तेव्हा तुमचेही पेंटींग लावतील, अशा खोचक शब्दात टीका आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता खासदार उदयनराजेंनी केली. दरम्यान, ३५ वर्ष सत्ता हाती होती काय केले, असा सवाल उपस्थित केला.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे जनतेच्या समस्यां घेवून गेलेले उदयनराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासोबत धरणग्रस्तांच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली. जिल्हाधिकारी त्यावर बैठक लावणार आहेत. उरमोडी धरणग्रस्तांचा दहा पंधरा वर्ष प्रश्न सुटलेला नाही. पीओपीवर बंदी आहे. पर्यावरणाला हानीकारक पीओपी आहे. मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळतात. शासनाचे जे आदेश आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली आहे. वडाप संघटनेच्याबाबत चर्चा झाली. शासनाने स्क्रॅपचा निर्णय घेतला असेल तरी त्या गाडय़ा स्क्रॅप केल्या तरी त्यांची मागणी एवढीच आहे. शोरुमला गाड्याच उपलब्ध नाहीत. तोपर्यत वेळ देण्यात यावा, अशी आहे. शासनाचे परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा करेन, असे त्यांनी सांगितले.

पेंटींगच्या वादाच्या प्रश्नांवर उदयनराजे म्हणाले, तो काय विषय असू शकत नाही. कोण काय बोलतय हे मी पेपरमध्ये वाचले, तेव्हा मला वाद झाल्याचे समजले. वाद वैगेरे काही झालेला नाही. शंभूराज पालकमंत्री आहेत. आमचे लोक त्यांच्याशी चर्चा करायला गेले होते. सिक्युरिटी वैगेरेबाबत त्यांना विचारले. वाद असे काहीच नाही. निश्चितपणे माझ्यावर भरपूर प्रेम असणारे काही लोक आहेत. काही महान व्यक्ती आहेत. त्यांनी इथे सांगितले की पेटींगबाबत त्यांची इच्छाच आहे तर बघु आता त्याचे काय करायचे ते. माझा स्तुतीप्रिय स्वभाव नाही. लोकांचे प्रेम आहे. म्हणून माझे पेटींग लोक लावतात. मी तरी काय करणार. माझ कर्तव्य लोकांची सेवा करणे आहे ती करतो आहे.

लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम होईल तेव्हा लोक त्यांचेही पेंटींग लावतील. आम्ही आमचे काम करतो. कधीही श्रेयवादात पडत नाही. काम कोणी केले हे सांगायची गरज नाही.

- उदयजनराजे भाेसले, खासदार

सत्ता असताना काम का झाले नाही ?

त्यांच्याकडे सगळी सत्ता असताना म्हणजे संपुर्ण आमदारकी, पालकमंत्री, नगरपालिका ताब्यात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, डीसीसी बँक असे सगळे असताना ३० ते ३५ वर्षांत काय झाले. आता लोकांनीं मला निवडून दिले. माझ्या हातून कामे झाली. मी प्रत्येकवेळी श्रेयवादात पडत नाही. काम कोणी केले हे महत्वाचे नाही. याच्या अगोदर काम का झाले नाही, असा सवाल उदयनराजे यांनी केला.

तिथं ठरेल उद्या इथं ठरेल

खासदार उदयनराजे यांना नागालॅण्डमध्ये झालेल्या राजकीय समिकरणाबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, त्या बैठकीला नेमका मी नव्हतो. काय नेमकं घडलं त्यामुळे मी त्यावर भाष्य करु शकणार नाही. काही ठरतय माहिती नाही. वेट अॅण्ड वॉच करुयात. त्या विषयावर मी भाष्य कसे करणार, तिथं ठरेल उद्या इथं ठरेल. पक्षाच्या बाबतीत मेहरबानी करुन विचारु नका, असा त्यांनी सल्ला पत्रकारांना दिला.