‘आज उत्तर दिलं नाही तर काय फासावर लटकवणार आहात का’? हक्कभंगाच्या नोटिसीवर हे काय म्हणाले संजय राऊत ?

विधिमंडळाचा नव्हे चोरमंडळ, या वक्तव्यावरुन अडचणीत सापडलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. या प्रकरणी विधानसभेच्या हक्कभंग समितीने त्यांना नोटीस पाठवल्याची माहिती आहे.

कोल्हापूर : विधिमंडळाचा नव्हे चोरमंडळ, या वक्तव्यावरुन अडचणीत सापडलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. या प्रकरणी विधानसभेच्या हक्कभंग समितीने त्यांना नोटीस पाठवल्याची माहिती आहे. यावर राऊत यांना विचारले असता नोटीस अद्याप पाहिली नसल्याचं त्यांनी सांगितलंय. अद्याप नोटीस हातात पडलेली नाही. इथं नोटीस मिळाली असती तरी लगेच उत्तर देऊ शकलो नसतो, असा युक्तिवादही त्यांनी केला आहे. ही कायदेशीर बाब आहे, कायद्याचा अभ्य़ास करुन याला उत्तर द्यावं लागेल. इतक्या घाईघाईत ते शक्य नसल्याचंही राऊत म्हणाले. या राज्यात सहळ्याच गोष्टी बेकायदेशीर सुरु आहेत. सरकारच बेकायदेशीर बसलेले असल्याची टीकाही त्यांनी केलीय. विधिमंडळाचा आणि आमदारांचं अवमान करणारं काहीही म्हटलेलो नाही, असंही स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे. एक विशिष्ट गट जो स्वताला शिवसेना म्हणतो आहे, त्या गटाबद्दल आपण वक्तव्य केलं असल्याचंही राऊत म्हणालेत. त्यामुळं हक्कभंग होतो की नाही, हे पाहावं लागेल. आज उत्तर दिलं नाही तर फासावर लटकवणार आहात का, असा सवालही त्यांनी विचारलाय. लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा, या शब्दांत त्यांनी सरकारवर राग व्यक्त केला आहे.

हक्कभंग समितीला विरोध 

राऊत यांच्या वक्तव्याच्या प्रकरणात विधानसभेत गठित करण्यात आलेली हक्कभंग समिती आक्षेपार्ह असल्याचं मत राऊत यांनी नोंदवलेलं आहे. ठाकरे गटाचा एकही सदस्य या समितीत का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. ज्यांनी याबाबत तक्रार केली त्यांनाच या प्रकरणात न्यायाधीश करण्यात येत असल्याचा प्रकार सुरु असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

चिंचवडमध्ये भाजपाचा विजय मानायला तयार नाही 

कसब्यात भाजपाचा पराभव झाला हे मान्य आहे. मात्र चिंचवडमध्ये त्यांचा विजय झाला हे मान्य नसल्याचं राऊत म्हणाले आहेत.

आठवले गटाला २ जागा हे आश्चर्य 

नागालँडमध्ये आठवले गटाला २ जागा मिळाल्या आहेत, हे जगातलं आश्चर्य असल्याची खोचक प्रतिक्रियाही राऊत यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या भूमीत त्यांना कधी जागा मिळाल्या नसल्या तरी नागालँडमध्ये मिळालेल्या जागांबाबत त्यांचं अभिनंदन करतो असंही राऊत म्हणालेत.