समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढाल, तर जेलमध्ये जाल; महामार्ग वाहतूक पोलिसांचा इशारा

वाहतूक पोलिसांनी समृद्धी महामार्गावर रील्स तसेच फोटो काढणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांना 500 रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे.

    तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून रील्स आणि फोटो काढणं आता महागात पडणार आहे. वाहतूक पोलिसांनी समृद्धी महामार्गावर रील्स तसेच फोटो काढणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून अनेक तरुण तसेच तरुणी फोटो तसेच रील्स काढण्याचे प्रकार वाढले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादजवळ समृद्धी महामार्गावरील पुलावर हुल्लडबाज तरुण रील्स काढत असल्याचं आढळून आलं आहे.

    वाहतूक पोलिस अॅक्शन मोडमध्ये

    समृद्धी महामार्गावरून जाणारी वाहने ही सुसाट वेगात असतात. अशातच रस्त्यावरून कुणी आडवं गेल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागतो. काहीवेळा अचानक ब्रेक दाबल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब समोर येताच वाहतूक पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

    एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा

    समृद्धी महामार्गावर रील्स तसेच फोटो काढण्यासाठी आता मनाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना 500 रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा समृद्धी महामार्गावर फोटो आणि रील्स काढण्यासाठी थांबत असाल, तर सावध राहणे गरजेचे आहे.