“लग्न व्हायचं असेल तर योग्य मुहूर्ताची…”, अजित पवार भाजपा प्रवेशावर गुलाबराव पाटलांचे सूचक वक्तव्य; पाटलांनी स्पष्टच एका वाक्यात सांगितले…

  जळगाव- महाराष्ट्रात सध्या राजकारणात (Maharashtra Politics) मविआ आणि भाजपा-शिंदे असा सामना रंगताना दिसत आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना, मागील काही दिवसांपासून मविआतील नेत्यांमध्ये सावरकर, अदानी, मोदी शैक्षणिक पदवी आदीवरुन मतभिन्नता दिसून आली, त्यामुळं मविआत समन्वय नाही का? असा प्रश्न निर्माण झाला असून, यावरुन सत्ताधाऱ्यांनी टिका केली आहे. मागील आठवड्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ येथे बैठक पार पडली. यावेळी मविआतील मतभिन्नतेवर चर्चा झाली, तसेच आगामी काळात एकत्र समन्वयाने काम करणावर भर देण्याचे बैठकीत ठरले असताना, दुसरीकडे मविआची वज्रमूठ सैल होताना दिसत आहे. कारण नाना-दादांमध्ये शाब्दिक वादाची ठिणगी पडली आहे. तर अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच ते भाजपामध्ये जाणार अशी सुद्धा चर्चा सुरु आहे. दरम्यान, यावर आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाष्य केलं आहे.

  लग्न व्हायचं असेल तर…

  दरम्यान, “बरेच आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. बघूया कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज आहे. आणि तिथी लवकरच येणार आहे. अजून तरी कूळ बघावे लागेल, गुण जुळावे लागतील त्यानंतर ते काम करावे लागेल”, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे सध्या. आकडा ते म्हणतील तोच आकडा होईल, असंही पाटील बोलले. अजित पवार यांची राजकीय विधाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणं आणि त्यांचं अचानक नॉट रिचेबल होणं यामुळं अजित पवार हे भाजपात जाणार का, यावर तर्कवितर्क काढले जात आहेत. त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चांन उधाण आलं आहे.

  पवार भाजबासोबत जाणार?

  शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका घेताहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतली. तसेच भाजपाला अनुकूल अशी वक्तव्य केली आहेत, तसेच जर सर्वोच्य न्यायालयाचा निर्णय सरकारच्या विरोधात आल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देणार असल्याचं देखील बोललं जातंय. त्यामुळं पवार भाजपासोबत जाणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

  मविआत चाललंय काय?

  गोंदिया बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याने पटोले-पवार वाद पेटला. ‘जो भाजप शेतकरीविरोधी धोरण आखतो त्याच्याशी आम्ही एकाच विचाराने लढत असताना राष्ट्रवादीला युती करण्याची गरजच काय? असं नाना पटोलेंनी म्हटलं होतं. त्यानंतर याला लगेच अजित पवारांनी प्रतिउत्तर दिलं. यामुळं मविआत चाललंय तरी काय? या दोन नेत्यामुळं मविआत वादाची ठिणगी पडली. मविआत समन्वय नाही का, असं बोललं जातंय. म्हणून वेणूगोपाल उद्या मुंबईत येणार असून, मविआतील संबंधाबाबत दोन वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.