दिवाळीचं फराळ खाण्यासाठी राजकीय नेत्यांकडे जाणार असाल तर…; जरांगेंकडून मराठा बांधवांना आवाहन

दिवाळीचं फराळ खाण्यासाठी राजकीय नेत्यांकडे जाणार असाल तर, आधी त्यांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारा, त्यांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्याचं सांगा, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करतांना मनोज जरांगे यांनी यापूर्वी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, आता त्यांनी यासाठी मराठा समाजाला आणखी एक नवीन आवाहन केले आहे. दिवाळीचं फराळ खाण्यासाठी राजकीय नेत्यांकडे जाणार असाल तर, आधी त्यांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारा, त्यांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्याचं सांगा, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

    जरांगे म्हणाले की, “राजकीय नेते दिवाळीच्या निमित्ताने फराळाचे कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे या कार्यक्रमांना मराठा समाजातील लोकं जात असतील, तर त्यांनी या नेत्यांकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा. तुम्ही मराठा आरक्षणासाठी आवाज उठवा असे सर्वात आधी या नेत्यांना सांगा, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. तसेच, येणाऱ्या अधिवेशनात प्रत्येक आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे, असेही या नेत्यांना सांगण्याचे जरांगे म्हणाले.

    उद्या डिस्चार्ज मिळणार ?

    दुसऱ्या टप्प्यात उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला मुदत दिली आहे. तेव्हापासून जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, आता आपली तब्येत ठणठणीत असून, 12 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या आपल्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.